आरक्षणाची मर्यादा ५० टक्के पेक्षा अधिक हवी – शरद पवार
मुंबई: गरजूंना आरक्षण मिळावे यासाठी आरक्षणाची मर्यादा ५० टक्के पेक्षा अधिक वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे अधिकार असून त्यासाठी केंद्राने पुढाकार घेतला तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मराठा आरक्षण आंदोलक रमेश केरे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यात सहभागी होऊ, असे पवार यांनी यावेळी सांगितले. दोन समाजात विस्टा येऊ नये यासाठी वेळीच काळजी घेतली जाणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
नजीकच्या भूतकाळात न्यायालयांनी दिलेले निर्णय पाहता आरक्षणावर असलेली 50 टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. हा अधिकार केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मर्यादा वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा. समन्वयाची भूमिका घेऊन आम्ही याबाबत केंद्र सरकारला सहकार्य करू, असे पवार यांनी सांगितले.
मराठा आणि इतर मागासवर्ग आरक्षण यासंबंधी निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्यात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. त्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनाही आमंत्रित करावे. इतर मागासवर्गाचे नेते छगन भुजबळ आणि इतरांनाही बैठकीत सहभागी करून घ्यावी. या संयुक्त बैठकीतून आरक्षण प्रश्न सर्वसंमत तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे पवार म्हणाले.
…. ती माझी पार्श्वभूमी नाही
शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अनेकदा केला आहे. ठाकरे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या मराठवाडा दौऱ्यात त्यांनी या आरोपाचा पुनरुच्चार केला. त्याबाबत बोलताना शरद पवार यांनी जातीय राजकारण करण्याची आपली पार्श्वभूमी नाही, असे स्पष्टीकरण दिले. मनोज जरांगे पाटील यांच्या आडून शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राजकारण करीत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. या प्रकरणात ठाकरे यांनी आपले नाव का घेतले, असा सवालही पवार यांनी केला. महाराष्ट्राच्या मणिपूर होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. महाराष्ट्राचा मणिपूर व्हावा यात हातभार लावत नाही, असा दावाही पवार यांनी केला.
