परभणी मनपा आयुक्तांवर कारवाई होणार- संजय बनसोडे
परभणी : परभणी शहर महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्याविरोधात सर्व लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली असून त्यांच्या कारभाराबद्दल खासदार-आमदारांनी मला पत्रही दिले आहे. हा विषय नगरविकास खात्याकडे असल्याने आपण मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात स्वत: पत्र देणार असून चौकशी करून त्यात दोषी आढळल्या तर मनपा आयुक्तांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी शनिवारी (दि.3) परभणी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
याप्रसंगी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आमदार श्रीराजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बनसोडे यांनी आजची जिल्हा नियोजन समितीची बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून महत्वपूर्ण विषयांवर लोकप्रतिनिधी व समितीच्या सदस्यांनी मते मांडली, त्यावर संबंधित विभागांना कार्यवाहीच्या सुचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
