नोव्हालीडच्या (NovaLead) पेटंटप्राप्त नवीन औषधाला डायबेटिक फूट अल्सरच्या (DFU) उपचारांसाठी CDSCO कडून भारतीय बाजारपेठेत वितरणासाठी मंजुरी
पुणे : पुणेस्थित नोव्हालीडच्या (NovaLead) पेटंटप्राप्त नवीन औषधाला डायबेटिक फूट अल्सरच्या (DFU) उपचारांसाठी CDSCO कडून भारतीय बाजारपेठेत वितरणासाठी मंजुरी मिळाली आहे. उपलब्ध औषधांचा संपूर्णतः वेगळ्या रोगावर उपयोग शोधण्याच्या पद्धतीचे भारतातील प्रणेते असलेल्या नोवालीड फार्मा प्रायव्हेट लिमिटेडने ही मान्यता मिळाल्याचे आज जाहीर केले. हे पेटंटप्राप्त औषध मधुमेही रुग्णांना पायाला आणि पावलांना होणाऱ्या किचकट जखमांवर उपयोगी ठरेल. बऱ्याचदा अशा जखमा दीर्घकाळ बऱ्या होत नाहीत आणि त्यावर खात्रीने उपयोगी असे औषोधोपचार सध्या फारसे उपलब्ध नाहीत. भारतात तसेच अगदी जागतिक पातळीवरदेखील ही एक मोठीच वैद्यकीय समस्या असून, नोव्हालीडचे हे औषध रुग्णांसाठी मोठाच दिलासा ठरेल. हे नवीन औषध या जखमा पूर्णतः आणि भक्कमपणे भरून यायला मदत करते.
१५% – २५% पेक्षा जास्त मधुमेही रुग्णांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी अशा स्वरूपाच्या जखमांचा त्रास होतो. DFU ही दीर्घकालीन मधुमेहामुळे होणारी सर्वात किचकट गुंतागुंत आहे. जगात अशा जखमा बऱ्या न झाल्यामुळे पायाचा काही भाग गमवावा लागण्याचे प्रमाण प्रचंड आहे. एकट्या भारतातच दरवर्षी अशा सुमारे लाखभर केसेस समोर येतात.
ज्या DFU ग्रस्त रुग्णांना त्यांना झालेल्या जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी आतापर्यंत मर्यादित औषध पर्याय उपलब्ध होते, त्यांच्यासाठी या औषधाला मिळालेली मान्यता एक महत्त्वाचा क्षण आहे. या औषधाला मिळालेली मान्यता हे प्रभावी सार्वजनिक – खाजगी भागीदारीचे उदाहरण आहे, कारण त्याच्या विकासासाठी BIRAC या सरकारी संस्थेकडून अंशतः निधी दिला गेला आहे, असे नोव्हालीड फार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रीत देशपांडे यांनी सांगितले.
“आम्ही हे औषध रूग्णांच्या सुरक्षिततेला अग्रस्थानी ठेवून नवीन औषधाप्रमाणेच सर्वसमावेशक प्रीक्लिनिकल आणि क्लिनिकल चाचण्या करून विकसित केले आहे. या औषधाला मिळालेली मान्यता ही औषध निर्मितीत सर्वात निर्णायक मानल्या जाणाऱ्या डबल ब्लाइंड फेज 3 क्लिनिकल चाचणीमधील सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण सकारात्मक परिणामांवर आधारित आहे”, असे नोव्हालीड फार्माचे संशोधन प्रमुख डॉ. सुधीर कुलकर्णी म्हणाले.
नोव्हालीडचे औषध हे हृदयविकारांसाठी वापरात असलेल्या एस्मोलॉल हायड्रोक्लोराइड या औषधाचे संपूर्णपणे वेगळे आणि नवीन फॉर्म्युलेशन आहे. जे औषध हृदयविकारांसाठी इंजेक्शन स्वरूपात दिले जाते, ते कंपनीने जखमांवर वापरता येईल अशा मलम (टॉपिकल जेल) स्वरूपात तयार केले आहे. या शोधासाठीचे स्वामित्व हक्क भारत तसेच अमेरिका, युरोपीय युनियन, जपान, चीन इत्यादी अनेक देशात नोव्हालीडला मिळालेले आहेत. हे औषध सर्वप्रथम भारतात वितरित केले जाणार आहे.
नोव्हालीड फार्माचे COO अतुल असलेकर यांनी नमूद केले की, “अभिनव औषधाच्या शोधापासून ते बाजारपेठेसाठी मंजूरी ही अनेकविध आव्हानात्मक टप्पे असलेली प्रक्रिया आहे. एका नवउद्यमी कंपनीने दीड दशकांहून अधिक काळ चिकाटीने कार्यरत राहून ती यशस्वीपणे पार करणे, ही भारतीय फार्मा उद्योगामधील एक अद्वितीय यशोगाथा आहे.”
“लवकरच एका अग्रगण्य औषध कंपनीतर्फे भारतातील DFU च्या रूग्णांना हे औषध उपलब्ध करून दिले जाईल. या नंतर अमेरिका आणि युरोपच्या बाजारपेठेत हे औषध आणण्यावर नोव्हालीड लक्ष केंद्रित करणार आहे.” असेही सुप्रीत देशपांडे म्हणाले.
डायबेटिक फूट अल्सर (DFU) बद्दल –
जगभरात ५३ कोटीहून अधिक लोक मधुमेहासह जगत आहेत आणि २०३० पर्यंत ही संख्या ६४ कोटीपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. सुमारे १५-२५% मधुमेहींना आयुष्यात किमान एकदा तरी DFU होतो. या पैकी सुमारे २५% रुग्णांना अखेरीस पायाचा काही भाग गमवावा लागतो ज्यामुळे त्यांच्या आयुष्याचा दर्जा खालावतो. DFU हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये औषधांचे पर्याय खूप मर्यादित आहेत आणि उपचारांचा खर्चदेखील खूप जास्त आहे.
औषधाबद्दल (एस्मोलोल हायड्रोक्लोराइडचे टॉपिकल जेल) –
हे एक प्रिस्क्रिप्शन औषध असेल ज्याचा उपयोग DFU वर उपचार करण्यासाठी केला जाईल. रुग्णाच्या DFU वर जरुरी असणारा डोस निर्धारित करण्यासाठी डॉक्टरांकडून तपासणी गरजेची आहे.
