Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अजित पवार यांना आपल्या घराचे दरवाजे कायम उघडे; मात्र… – शरद पवार

पुणे:  भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसलेल्या अजित पवार यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे आत्तापर्यंत सांगणाऱ्या शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वेगळे विधान करून एकाच वेळी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व या दोघांमध्येही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांना आपल्या घराचे दरवाजे कायम उघडे आहेत. मात्र, परत पक्षात यायचे असेल तर त्याबाबतचा निर्णय मी एकटा नव्हे तर पक्ष घेईल, असे विधान पवार यांनी केले आहे. 

पहाटेच्या शपथविधीला जाणाऱ्या अजित पवार यांना पक्षात परत घेऊन सण 2019 मध्ये चूक केली. आता यावेळी मात्र त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमचे बंद आहेत, असे शरद पवार आणि त्यांच्याबरोबर एकनिष्ठ राहिलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ सहकारी वारंवार सांगत आले आहेत. आज पत्रकारांशी बोलताना मात्र, शरद पवार यांचा सूर बदललेला होता. अजित पवार यांना पुन्हा पक्षात घ्यायचे असेल तर बंडानंतर आपल्याशी एकनिष्ठ राहिलेल्या सर्व सहकाऱ्यांशी विचार विनिमय करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. मी एकटा त्यावर निर्णय घेणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. 

शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात जातीवादाचे विष पेरले या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपाचा समाचार घेताना शरद पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली. एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर राज ठाकरे यांना सात आठ दिवसांनी किंवा महिन्या दोन महिन्यांनी जाग येते. त्यानंतर ते त्यावर काही विधान करतात. ज्याच्यावर विधान केल्यानंतर लोकांकडून प्रतिसाद मिळेल, अशांवरच ते बोलतात, असे पवार म्हणाले. 

विधान परिषद निवडणुकीत शरद पवार यांनी पुरस्कृत केलेले उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्याची कारणमीमांसाही पवार यांनी पत्रकारांसमोर मांडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाने कोणत्याही पक्षाची फसवणूक केलेली नाही. मात्र, आपल्या पक्षाची बारा मते जयंत पाटील यांना जातील हे सांगतानाच काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मतांचा प्राधान्यक्रम कसा असावा, याबद्दल आपण काही आखणी केली होती. तसे झाले असते तर आमचे उमेदवार निवडून आले असते. मात्र, प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगवेगळा ठरला आणि जयंत पाटील यांचा पराभव झाला, असे पवार यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र बसून उमेदवारीबद्दल चर्चा केली नव्हती. प्रत्येक पक्षाने आपापले संख्याबळ लक्षात घेऊन उमेदवार उभे केले, असेही ते म्हणाले. 

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या विषयात सत्ताधाऱ्यांच्या विधानामुळे तणावात भर पडत असल्याचा आरोप पवार यांनी केला. सर्व पक्षांनी एकत्र येऊन याबाबतीत निर्णय घ्यावा यासाठी राज्यकर्त्यांनी विरोधकांना बैठकीसाठी पाचारण केले. मात्र, यापूर्वी वेळोवेळी मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांनी केलेल्या आंदोलनात सरकारच्या वतीने त्यांना काय काय आश्वासने देण्यात आली, त्यापैकी कशाची पूर्तता करण्यात आली, याबाबत कोणतीही माहिती आत्तापर्यंत विरोधकांना देण्यात आलेली नाही. त्यानंतर या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी आणि समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. आताही आंदोलकांची नेमकी भूमिका काय आहे, त्याबाबत सरकारने काय काय केले आहे, यापुढे काय आणि कसे करणार आहे, याबद्दल माहिती दिल्यास आपण ही समस्या सोडविण्यात सहकार्य करू. शेवटी समाजात शांतता राहणे हे अधिक आवश्यक आहे, असेही पवार म्हणाले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading