Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

…..तर आणखी 25 ते 30 जागा वाढल्या असत्या – संजय राऊत

मुंबई:  एकीकडे शरद पवार यांच्या सामूहिक नेतृत्वाच्या सूत्राला सहमती व्यक्त करतानाच दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबतची मागणी पुन्हा एकदा रेटली आहे. त्याचे समर्थन करताना राऊत यांनी, लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले असते तर आणखी 25 ते 30 जागा वाढल्या असत्या, असा दावा केला आहे. 

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, सामूहिक नेतृत्व हेच महाविकास आघाडीचे सूत्र आहे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून आम्ही कोणत्याही एका व्यक्तीबाबत विचार केलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. 

 पवार यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी त्यांचे म्हणणे बरोबरच असल्याचे सांगितले. मात्र, कोणतेही सरकार किंवा संस्था बिन चेहऱ्याची असू नये, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही घटक पक्षांचे सर्व नेते एकत्र बसून त्याबाबत विचार करू, असेही राऊत म्हणाले.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणूकही आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवू. आम्ही एकत्र निवडणूक लढल्याने काय निकाल लागले, ते सर्वांनी पाहिले आहे. हीच एकजूट विधानसभा निवडणुकीतही कायम राहील. विधानसभेच्या 175 ते 180 जागांवर महाविकास आघाडी विजय मिळवेल, असा दावाही राऊत यांनी केला. 

राजाश्रयाशिवाय फोफावणार नाही ड्रग्जचा व्यापार 

पंजाब प्रमाणे पुणे शहरही अमली पदार्थांचा अड्डा बनत आहे. राजाश्रय आणि पोलिसांचे सहकार्य असल्याशिवाय अमली पदार्थांचा व्यापार फोफावणार नाही, असा आरोपराऊत यांनी केला. पुण्यातील एक पिढीच्या पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. हे अमली पदार्थ गुजरात मधून आणले जातात. पुणे आणि नाशिक ही अमली पदार्थांची केंद्र बनली आहेत. तुम्ही बुलडोजर चालवता. बार पाडता. पब जमीनदोस्त करता. मात्र, त्यामुळे अमली पदार्थांची विक्री थांबणार आहे का, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला, विशेषतः बुलडोजर कारवाईचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading