Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पावसाळी अधिवेशन : विरोधकांची पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सरकारला अधिवेशन काळातील आपल्या इराद्यांची चुणूक दाखवून दिली. महायुती सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करून विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी केली.

विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे या दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीज बिल माफी झालीच पाहिजे, कोरडा डोळा कोरडी विहीर, शेतकऱ्यांना कोण देणार धीर, अशा घोषणांचे फलक हाती घेऊन, टक्केवारी सरकार हाय हाय,, चोर सरकार हाय हाय अशा घोषणा देत विरोधकांनी निदर्शने केली.

सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून त्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही, असा आरोप करताना दानवे यांनी शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी, अशी मागणी ही केली.

अधिवेशन काळात सरकारला घेरण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे शेतकऱ्यांच्या समस्येबरोबरच पाणीटंचाई, पुण्यातील पोर्षेकार प्रकरण, अमली पदार्थ विक्री प्रकरण, मराठा आरक्षण आंदोलन, इतर मागासवर्गीयांचे आरक्षण बचाव आंदोलन, वाढती गुन्हेगारी अशा अनेक मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्याचे विरोधकांचे धोरण आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading