मुस्लिम मते 100 टक्के काँग्रेसकडे वळली – प्रकाश आंबेडकर
जालना: अकोला लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाकडून आपल्याला अपेक्षित मतदान झाले नाही. मुस्लिम मते 100 टक्के काँग्रेसकडे वळली. त्यामुळे आपला पराभव झाला, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.
‘आरक्षण बचाव’ या मागणीसाठी इतर मागासवर्गीय समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी अंतरवाली सराटीच्या वेशीवर असलेल्या वडीगोद्री या गावी उपोषण करीत आहेत. आंबेडकर यांनी उपोषणस्थळी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हाके आणि वाघमारे यांना पाणी पिऊन उपोषण सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. त्याचा मान ठेवून दोन्ही उपोषणकर्त्यांनी पाणी प्राशन केले. माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी पाणीही न घेता उपोषण केल्यामुळे त्यांची किडनी खराब झाल्याचे उदाहरण त्यांनी उपोषणकर्त्यांना दिले.
यावेळी आंबेडकर यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी अकोला मतदारसंघात झालेल्या आपल्या पराभवाचे विश्लेषण माध्यमांसमोर मांडले. या मतदारसंघात इतर मागासवर्गीय, मागासवर्गीय यांच्याबरोबरच मुस्लिम मतदार आपल्या पाठीशी राहिला आहे. मात्र, या निवडणुकीत 100 टक्के मुस्लिम मतदार पूर्णपणे काँग्रेसकडे वळले. त्यामुळे मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयांची मते मिळूनही आपला पराभव झाला. काही प्रमाणात मुस्लिम मते आपल्याकडे वळली असती तरीही आपला विजय झाला असता, असा दावाही आंबेडकर यांनी केला.
आमच्या आरक्षणात वाटेकरी नको: हाके
यावेळी पत्रकारांशी बोलताना हाके म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची कोणतीही हरकत नाही. मात्र, आम्हाला आमच्या आरक्षणात वाटेकरी नको आहे. सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले तरी त्याला आमची हरकत नाही. मराठा समाजाला सगे सोयऱ्यांची व्याख्या करायची असेल तर आरक्षणात वर्गीकरण असावे. अन्यथा त्या आरक्षणाला आमचा विरोध असेल, असेही हाके म्हणाले.
