आयुष्य किती आहे यापेक्षा मिळालेल्या आयुष्यात काय केले हे महत्वाचे ह.भ.प. प्रभाकर दादा महाराज बोधले यांचे मत
पुणे : संत ज्ञानेश्वर माऊली यांना अत्यंत कमी आयुष्य मिळाले पण ते त्यांच्या कार्यातून आजही जिवंत आहेत. त्यांनी २४ व्या वर्षात जगाला संदेश दिला आणि आज सातशे वर्षांनंतरही लोकांच्या मुखी माऊलींचे नाम आहे. ज्ञानेश्वर माऊलींकडे पाहून कळते की, आयुष्य किती मिळाले, कुठे जन्माला आलो याला अर्थ नाही तर मिळालेल्या आयुष्यात आपण काय केले हे महत्वाचे आहे, असे मत ह.भ.प. प्रभाकर दादा महाराज बोधले यांनी व्यक्त केले.
न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्यावतीने ५ वा कीर्तन महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले. महोत्सवात कीर्तन महर्षी पुरस्कार ह.भ.प. प्रभाकर दादा महाराज बोधले यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, जयवंत महाराज बोधले, प्राचार्य देशमुख सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह शिक्षक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कीर्तनाद्वारे शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांच्या प्रबोधनाकरीता संस्थेच्या आवारात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. चार दिवसीय कीर्तन महोत्सवात ह.भ.प. माऊली महाराज शेडगे, ह.भ.प. सुनील महाराज शिंदे, ह.भ.प. प्रभाकर दादा महाराज बोधले यांचे कीर्तन झाले तर कीर्तन केसरी शिवशंभु व्याख्याते ह.भ.प. राजेंद्र महाराज येप्रे यांच्या कीर्तनाने महोत्सवाचा समारोप झाला. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते.
प्रभाकर महाराज बोधले म्हणाले, आजचे तरुण २४ वर्षात व्यसनाधिन होऊन वाढदिवस साजरा करतात. निर्थक गोष्टीत आपले आयुष्य व्यथीत करतात. तुम्ही किती वर्ष जगलात यापेक्षा त्या वर्षांत तुम्ही काय कार्य केले हे महत्वाचे असते, असेही त्यांनी सांगितले.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, संस्थेच्यावतीने समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. भागवत धमार्ची पताका फडकवित राहिले पाहिजेत, याकरीता भक्ती व शक्तीचा मिलाप असलेला हा कीर्तन महोत्सव दरवर्षी राबविण्यात येतो. यामहोत्सवातील विषयांतून सर्वांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल हा उद्देश ठेवून कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. असेही त्यांनी सांगितले.
