Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

९१ दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल दुकानाचे वाटप सुरु

पुणे : दिव्यांग व्यक्तींना रोजगारक्षम करण्याच्या उद्देशाने पुण्यातील रोटरी पूना डाऊनटाऊन व प्रवीण मसालेवाले ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ९१ दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल दुकान वाटपाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. प्रवीण मसालेवालेचे संस्थापक स्व हुकमीचंद चोरडिया (भाऊ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हडपसर औद्योगिक वसाहत येथील एमसीसीआयएच्या सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रवीण मसालेवालेचे कार्यकारी विश्वस्त राजकुमार चोरडिया, मधुबाला चोरडिया, संचालक विशाल चोरडिया व आनंद चोरडिया यांच्या हस्ते आज प्रातिनिधिक स्वरूपातील तीन चाकी सायकल दुकानाचे वाटप १५ दिव्यांग बांधवांना  करण्यात आले. रोटरी पूना डाऊनटाऊनच्या अध्यक्षा अरुणा राठी,  शब्बीर  जामनगरवाला आदी मान्यवर यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.

या उपक्रमासंदर्भात बोलताना राजकुमार चोरडिया म्हणाले, “प्रवीण मसालेवालेचे संस्थापक स्व. हुकमीचंद चोरडिया (भाऊ) यांनी दिलेली शिकवण व मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवीत म्हणून आम्ही अनेक सामाजिक कामे हाती घेत असतो. दिव्यांगांसाठी भरीव कार्य करावे, या इच्छेने आम्ही रोटरी पूना डाऊनटाऊनच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तींना या तीन चाकी सायकल दुकानाचे वाटप करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींना आपला उदारनिर्वाह करण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने आम्ही  वर्षभरात ९१ दिव्यांगांना हे सायकल दुकान प्रदान करून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या व्यक्तींना नजीकच्या काळात आवश्यक भांडवल आणि इतर सहकार्य देऊन त्यांचे पालकत्व देखील घेणार आहोत. या प्रकल्पासाठी उत्कर्ष या संस्थेची आम्हाला खूप मदत झाली.”

माझे आजोबा स्व हुकमीचंद चोरडिया (भाऊ) यांना त्यांच्या व्यावसायिक प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात सायकलची खूप मदत झाली त्यामुळे आज त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाचे औचित्य साधत होत असलेला हा कार्यक्रम माझ्यासाठी खास आहे. या सायकल दुकान वाटप प्रकल्पाद्वारे त्यांचेच आशीर्वाद आणि शुभेच्छा या सर्व दिव्यांग बांधवांना मिळत आहेत, असे मला वाटते. माझ्या आजोबांचे आशीर्वादाने हे सर्व व्यावसायिक यशस्वी होतील असा माझा विश्वास आहे, असे सांगत विशाल चोरडिया यांनी आजोबांना आदरांजली वाहिली.

यावेळी तीन चाकी सायकल दुकान मिळालेल्या अक्षया गायकवाड मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, “जन्मत: दिव्यांग असल्याने आपण स्वत:च्या पायावर उभे रहावे आणि कुटुंबाची काळजी घ्यावी हे माझे स्वप्न स्वप्नच राहील असे वाटत होते. मला गेली अनेक वर्षे चहाचे दुकान टाकून माझा व्यवसाय सुरु करायचा होता. त्यासाठी मदत मिळावी म्हणून शासन आणि अनेक सामाजिक संस्थांकडे मी मदतही मागितली मात्र आजवर मला केवळ कारणे सांगण्यात आली आणि मदत कोणीच केली नाही. आज प्रवीण मसालेवाले ट्रस्ट आणि रोटरी पूना डाऊनटाऊनच्या पुढाकाराने हे सायकल दुकान मिळाल्यानंतर स्वप्नपुर्तीची भावना दाटून येत आहे. आता मी खूप कष्ट करून खऱ्या अर्थाने स्वत:च्या पायावर उभी राहील याचा आनंद आहे.”

उत्कर्ष अपंग संस्थेच्या सविता मोरे म्हणाल्या, अनेक दिव्यांग व्यक्तींची काम करण्याची आणि स्वत:च्या हिंमतीवर काहीतरी करून दाखविण्याची प्रामाणिक इच्छा असते मात्र, त्यांना अनेकदा मदत मिळत नाही. प्रवीण मसालेवाले ट्रस्ट आणि रोटरी पूना डाऊनटाऊन यांद्वारे होत असलेले हे तीन चाकी सायकल दुकान वाटप यामध्ये भरीव मदत करणारे ठरेल. यामुळे दिव्यांग व्यक्ती स्वत:चा उदरनिर्वाह करू शकल्याने त्यांच्यासोबतच त्यांचा परिवार देखील स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.

यावेळी विशाल चोरडिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. अरुणा राठी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रदीप मुनोत यांनी रोटरीच्या उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली. जितूभाई मेहता यांनी स्व हुकमीचंद चोरडिया (भाऊ) यांच्या विषयीच्या आठवणी जागविल्या. प्रदिप मुनोत यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर शब्बीर जामनगरवाला यांनी आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading