Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

 मोदींच्या चेहऱ्यावर विसंबून संघ राहिला उपेक्षित; ‘ऑर्गनायझर’चा घरचा आहेर

नवी दिल्ली:  नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 400 पारची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवाचे विश्लेषण करताना संघ परिवाराचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने पक्षाला असंगाशी संग नडला असल्याचे सुनावत भाजपला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या सर्वाधिक खासदार संख्या असलेल्या राज्यातील पराभवाला भाजप स्वतःच कारणीभूत असल्याचे ‘ऑर्गनायझर’ने दाखवून दिले आहे.

भाजप आणि शिवसेना यांची हिंदुत्वाच्या विचारावर आधारित नैसर्गिक युती आहे. भाजपा शिवसेना युतीचे सरकार बहुमताने महाराष्ट्रात कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडखोर अजित पवार यांच्याशी भाजपने केलेली जवळीक भाजपाच्या हक्काच्या मतदारांना आवडलेली नाही. अजित पवार आणि त्यांचे सहकारी यांच्या कथित भ्रष्टाचाराबद्दल एकेकाळी भाजपने आगपाखड केली होती. अजित पवार यांना तुरुंगाची हवा खायला लावणार असल्याची बढाई देखील मारली होती. राज्यात बहुमत असताना अशा अजित पवार यांना सोबत घेण्याची कोणती गरज भाजपला वाटली, असा सवाल ऑर्गनायझरमधील आपल्या लेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत मानल्या जाणाऱ्या रतन शारदा यांनी आपल्या लेखात केला आहे.

याच लेखात जुने काँग्रेसवासी कृपाशंकर सिंह यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन लगेच खासदारकीचे तिकीट देण्याच्या निर्णयावरही कठोर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मंत्री राहिलेले कृपाशंकर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्याचप्रमाणे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे कथित पसरविण्यात कृपाशंकर सिंह यांचा हातभार असल्याचा संघाचा आरोप आहे. कृपाशंकर सिंह यांना भाजपमध्ये घेण्यास अनेकांनी विरोध व्यक्त करूनही त्याची दखल न घेता मुंबईमध्ये कृपाशंकर सिंह यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आणि लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश मधून त्यांना उमेदवारीही देण्यात आली. या निर्णयावर संघ स्वयंसेवक नाराज असून त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीच्या निकालात उमटले, असे या लेखात नमूद करण्यात आले आहे.

 मोदींच्या चेहऱ्यावर विसंबून संघ राहिला उपेक्षित 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अराजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना असली तरीही ती भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे. निवडणुकीच्या काळात या संघटनेची सुसज्ज यंत्रणा भाजपच्या मदतीला उभी असते. या निवडणुकीत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याकडे पाहून मतदार भाजपला भरभरून मतदान करतील या समजूतीने भाजपकडून संघाच्या यंत्रणेची दखल घेतली गेली नाही. प्रचार मोहिमेदरम्यान संघ स्वयंसेवकांना मदतीसाठी साद घातली गेली नाही. उलट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही, असे विधान केले. त्यामुळे संघ स्वयंसेवक निवडणुकीच्या कामापासून लांब राहिला. त्याची फळे भाजपाला भोगावे लागली, असेही त्यात दाखवून देण्यात आले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading