महायुतीच्या पराभवाला शेतकऱ्यांची नाराजी हे एक प्रमुख कारण -एकनाथ शिंदे यांची कबुली
मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी पार पाडता आली नाही. या पराभवाला शेतकऱ्यांची नाराजी हे एक प्रमुख कारण असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कृषी क्षेत्रातील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेणार असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 40 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या महायुतीला या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका सहन करावा लागला. आता या पराभवाचे विश्लेषण केले जात आहे. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे विश्लेषण महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची नाराजी हे या पराभवा मागच्या प्रमुख कारणांपैकी एक असल्याची कबुली दिली आहे.
निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात कांद्याने तर विदर्भ मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन ने आमच्या डोळ्यात पाणी आणले, असे शिंदे यांनी नमूद केले आहे. स्थानिक बाजारपेठेतील दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ती मे महिन्याच्या सुरुवातीला उठविण्यात आली. या निर्यात बंदीचा फटका विशेषतः नाशिक परिसरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसला. त्याबद्दल केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात मोठ्या प्रमाणात आवाजही उठवण्यात आला. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत महायुतीला भोगावे लागला, असे निरीक्षण मुख्यमंत्र्यांनी नोंदविले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन कांदा, कापूस आणि सोयाबीन यांना चांगले दर निश्चित करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 400 पारचा नारा देत मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. त्यामुळे विरोधक संपुष्टात आणून भाजपा आणि मित्रपक्ष घटनेला निष्प्रभ करणार, आरक्षण संपवून टाकणार या विरोधकांच्या प्रचाराला अधिक धार प्राप्त झाली. त्याचा फटका महायुतीला सहन करावा लागला, असेही शिंदे यांनी पराभवाचे विश्लेषण करताना नमूद केले आहे.
