Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

‘इस्लाह‌’ परंपरा जपल्याने गझल नेमकी अन्‌‍ नेटकी : प्रा. मिलिंद जोशी


पुणे : आशयसूचक कवितेपेक्षाही गझल या काव्य प्रकाराला आजच्या काळात वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. सामाजिक आशयसंपन्न गझलेच्या माध्यमातून गझलेची स्वतंत्र्य अभिव्यक्ती दिसून येते. या उलट काव्य हा साहित्यप्रकार मुक्तछंद सोडून मोकाट छंदाकडे झुकला आहे. गझल प्रकारातील आचारसंहिता जपून ‌‘इस्लाह‌’ म्हणजेच दुरुस्ती करणे गझलकारांनी आजही टिकवून ठेवल्याने पुनर्लेखनाच्या माध्यमातून ही साहित्यकृती नेमकी व नेटकी होत जाते, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे गझलकार दीपक करंदीकर स्मृती पहिला पुरस्कार गझलकार मिलिंद छत्रे यांना आज (दि. 9) प्रा. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, विद्या दीपक करंदीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गझलकार दीपक करंदीकर यांच्या साहित्यकृतीत जबरदस्त ताकद होती. सुरेश भटांची परंपरा पुढे नेण्यात करंदीकर यांचा मोठा हात होता ते निस्पृह व उत्तम वाङ्मयीन कार्यकर्ता होते, असे गौरवोद्गार काढून प्रा. जोशी पुढे म्हणाले, छत्रे हे आश्वासक गझलकार आहेत. त्यांच्या गझलांमधून अनुभवविश्व, जगाकडे पाहण्याची समृद्ध दृष्टी दिसून येते. कवीसाठी अनुभवसमृद्धी, साधनाचे संचित महत्त्वाचे असते. परंतु आजच्या साहित्यकारांची श्रम करण्याची तयारी नाही. कविता ही शब्दांची आतषबाजी नव्हे तर शब्दांची उपासना आहे हे आज जाणून घेतले जात नाही त्यामुळे वाङ्मय प्रकाराची प्रतिष्ठा ठेवली जात नाही, ही आजची विदारक परिस्थिती आहे. साहित्य प्रकारातील परंपरा मोडली तरी चालेल परंतु ती आधी समजून घेणे आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. समीक्षेचे अध:पतन हे साहित्याचे अध:पतन ठरते आहे, अशी टिप्पणीही त्यांनी साहित्यक्षेत्रातील समीक्षेविषयी केली.
चाळीस वर्षांच्या मैत्र-स्नेहाचा धागा उलगडून ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात दीपक करंदीकर यांच्या स्मृती कायम जपल्या जाव्यात यासाठी उत्कृष्ट गझलकाराची निवड करून पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असे सांगितले.
पुरस्कारामागील भूमिका विशद करीत भूषण कटककर म्हणाले, सुरेश भट यांची गझल परंपरा पुढे चालविण्यात दीपक करंदीकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांच्या गझलांमध्ये तरलता आणि आर्तता यांचा संगम दिसून येतो.
पुरस्काराला उत्तर देताना मिलिंद छत्रे म्हणाले, कवीला आतून दाटून येते तेव्हा तो लिहिता होतो; तसेच रंगत-संगत, करम प्रतिष्ठानसारख्या संस्थांमार्फत साहित्यिकाला बाह्यप्रेरणा मिळते. ज्यातून लिखाण सुधारण्यास, सहजभाव अंगी येण्यास मदत होते. सादरीकरण हे उर्जा असेल तर असे पुरस्कार हे उर्जेचे भांडार आहेत. कविता-गझल हा साहित्यप्रकार विरंगुळा किंवा वेळ जाण्यासाठी नव्हे तर गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे. पुरस्काराने प्रेरणा मिळते व नविन काहीतरी करण्याची उर्जाही लाभते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले तर परिचिय पत्रवाचन वासंती वैद्य यांनी, सन्मानपत्र वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित मराठी स्व-रचित गझल संमेलनात प्रभा सोनवणे, अमृता जोशी, डॉ. दाक्षायणी पंडित, डॉ. मृदुला खैरनार-कुलकर्णी, स्वप्नील पोरे, वैशाली मोहिते, प्रा. शैलजा किंकर, वर्षा कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी, सुजाता पवार, स्वाती यादव यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading