जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील दहावी, बारावीच्या ४७ विद्यार्थ्यांची गगनभरारी
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. ट्रस्टने शैक्षणिक साहित्यासह इतर सर्वच गोष्टींकरीता दिलेला मदतीचा हात आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची जिद्द यामुळे योजनेअंतर्गत ३८ विद्यार्थ्यांनी दहावी आणि ९ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत भरारी घेत उत्तम कामगिरी केली आहे.
ट्रस्टच्या योजनेतील नू.म.वि. प्रशालेत शिकणा-या आर्यन काशिद या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवून योजनेंतर्गत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसूनही आर्यन ने हे उत्तुंग यश मिळविले आहे. त्याला पुढे वैज्ञानिक व्हायचे असून ट्रस्टच्या उपक्रमात मिळालेल्या सहकार्यामुळे यश मिळाल्याचे त्याने यावेळी सांगितले.
महाराष्ट्र विद्यालयातील अभिजीत भंडारी याने ९४.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकणा-या सिद्धेश अडसूळ याने ९४.४० टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक मिळविला आहे. याशिवाय रोहन चोरडीया, अथर्व शिंदे, गणेश कदम, श्रुतिक होडे, तन्मय काळे, साई जाधव यांनी देखील उत्तुंग यश मिळवुले आहे.
योजनेंतर्गत बारावीच्या परीक्षेत नू.म.वि. कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या प्रज्ञा चेन्नूर हिने ७२.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. ती घोरपडे पेठ येथे रहात असून भविष्यात तिचे सीए होण्याचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने ती अभ्यास करीत आहे. एमआयटी विज्ञान शाखेतील संस्कृती चव्हाण हिने ६५.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर एआयएसएसपीएमएस वाणिज्य शाखेतील साई कद्रे हिने ६० टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
याशिवाय बारावी परीक्षेत अंजली जाधव, सोहल डोख, श्रृती भवार, श्रीपाद एडके, संस्कृती लगशेट्टी, प्रतिक्षा येरझरी यांनी देखील उत्तुंग यश मिळविले आहे. ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील शिक्षणासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रस्टच्या कोंढवा येथील बालसंगोपन केंद्रातील विद्यार्थ्यानी देखील उत्तम यश मिळविले आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, सन २०१० पासून ही योजना सुरु असून विद्यार्थ्यांना संस्कार वर्ग, समुपदेशन, शिकवणी, परीक्षा, शैक्षणिक साहित्य, १ लाख रुपयांचा विमा या सर्व सुविधा दिल्या जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यादृष्टीने ट्रस्ट प्रयत्नशील आहे. आजपर्यंत १०० हून अधिक विद्यार्थी विविध क्षेत्रात संपूर्ण देशात उच्चपदांवर कार्यरत आहेत. यापुढे देखील योजनेतील विद्यार्थ्यांना सर्व मदत ट्रस्ट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
