Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

तुम्हाला लोकांच्या संवेदना कधी समजल्याच नाहीत; सुनील ताटकरेंचा अनंत गिते यांच्यावर हल्लाबोल

रायगड : अनंत गीते तुम्ही नशीबवान आहात. मोदींच्या मंत्रीमंडळात तुम्हाला अवजड की अवघड खाते मिळाले. त्याचे महत्त्व तुम्हाला कधी कळलेच नाही. पाच वर्षांत तुम्ही मोदींच्या मंत्रीमंडळात काम करुनही एक रुपयांची गुंतवणूक आणता आली नाही. तुम्हाला लोकांच्या संवेदना कधी समजल्याच नाहीत. असं म्हणत रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांच्यावर हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ रोहा येथे महायुतीची सभा पार पडली. त्यावेळी तटकरे बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, अपयश जेव्हा पचवता येत नाही. त्यावेळी आत्मपरीक्षण करायचे असते. ४० वर्षांत विकास हेच ध्येय ठेवून जनसामान्यांच्या कामासाठी पुढाकार घेत आलो आहे. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे. तोपर्यंत विकास हेच ध्येय घेऊन काम करत राहणार, असून त्यामुळेच तुम्ही मला लाखोंच्या फरकाने विजयी कराल, असा विश्वास देखील सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

देशाच्या हितासाठी, राष्ट्रहितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ‘घड्याळ तेच वेळ नवी’ आहे. त्याचबरोबर घटना बदलली जाणार असा अभास निर्माण करण्याचा एकमेव कार्यक्रम विरोधकांकडे सध्या आहे. शेकाप हा एक छोटासा पक्ष पण जणू काही हाच भावी पंतप्रधान करणार असे दाखवत आहेत. इंडी आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही आणि त्यांनी जाहीर केला तर आघाडीचे तुकडे झालेले पहायला मिळतील. अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केलीय.

तसेच पेण येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिनांक २६ एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेला महायुतीच्या नेत्यांची ही रायगड लोकसभा मतदारसंघातील पहिलीच जाहीर सभा होणार आहे. या सभेला मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील तटकरे यांनी केले.

तर मुंबई महानगरपालिका म्हणजे उबाठाचा आत्मा आहे. मासा जसा पाण्याबाहेर पडल्यावर तडफडतो. तसा मुंबईमध्ये महानगरपालिका महायुतीच्या ताब्यात आल्यावर तशी होणार आहे आणि आगामी येणाऱ्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू, त्यावेळी त्यांची अवस्था काय होईल, अशी शक्यता देखील तटकरे यांनी व्यक्त केली. या महायुतीच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, भाजप, शिवसेना, मनसे, आरपीआय आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading