fbpx
Sunday, May 26, 2024
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

मोदी आणि भाजपापासून संविधानाला धोका – राहुल गांधी

सोलापूर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस आणि भाजपापासून संविधानाला धोका आहे. पंतप्रधान मोदी यांचे संविधानावर आक्रमण झाले आहे त्यामुळे इंडिया आघाडी संविधान वाचविण्यासाठी तर एनडीए संविधान बदलण्यासाठी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी बुधवारी सोलापुरातील मरीआई चौकातील महापालिकेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, संविधान हे गरीब आणि दीन दलितांसाठी मोठे हत्यार आहे, हे हत्यार उद्ध्वस्त करण्याचे काम भाजाप करीत आहे, असा आरोपही गांधी यांनी केला. देशात २२ लोकांकडे ७० कोटी धन आहे. २२ लोकांसाठी नोटाबंदी, किसान सन्मान योजना केली. देशातील गरीब आणि शेतक-यांचा १ रुपया कमी केला नाही. मोदींनी गरिबांचा एकही रुपया कमी केलेला नाही. काँग्रेस महालक्ष्मी योजना आणणार आहे. लोकशाही वाचविण्यासाठी ही निवडणूक आहे. इंडिया आघाडी सरकार आल्यावर गरीब कुटुंबांची यादी बनवून आणि दरवर्षी गरिबाच्या बँक खात्यावर १ लाख रुपये टाकणार आहे.

मोदींनी अनेकांना करोडपती बनवले, आम्ही लखपती बनवणार आहोत. मोदींनी फक्त देशातील २२ करोडपतींना मदत केली आणि गरिबांना वा-यावर सोडले आहे. मोदींनी गरिबाचे कर्ज माफ केलं नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
देशातील युवकांना रोजगार देण्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आणि त्रास दिला आहे. ४५ वर्षात सर्वाधिक बेरोजगारी आज भारतात आहे. आशा आणि अंगणवाडी सेविकांचे मानधन दुप्पट करणार केले जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी या वेळी दिले.

नोटाबंदी आणि बेरोजगारीमुळे देशातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला, याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किंमत चुकवावी लागेल. श्रीमंतांच्या मुलांना देशातील सर्वात महागडी सुविधा मिळते तीच सुविधा गरिब कुटुंबातील मुलांना देणार आहोत. हा नवीन कायदा आम्ही आणणार आहोत. पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, सरकारी कार्यालयात एक वर्ष अप्रेंटिसशीप नोकरीची एनडीए गॅरंटी देणार आहे. लोकांना केवळ प्रशिक्षण आणि नोकरी देणार नाही तर दरवर्षी अकाऊंटवर १ लाख रुपये देणार आहोत. महिला, बेरोजगार आणि देशातील शेतक-यांच्या बँक खात्यावर दरवर्षी १ लाख रुपये टाकणार आहोत, असेही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी यांचे शेतक-यांची कर्ज माफ केली नाहीत मात्र एनडीए सरकार शेतक-यांची कर्ज माफ करणार आहे. धनदांडग्यांची कर्जे पंतप्रधान नरेंद्र मोदी माफ करतात तर शेतक-यांचीसुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे. शेतक-यांसाठी एक आयोग स्थापन करणार. नवा आयोग शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी काम करणार, कर्जमाफीची गरज असेल तेव्हा आयोग अहवाल देणार, आमचं सरकार आल्यावर शेतक-यांचे कर्ज माफ करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. देशातील कोणत्याही कंपनीमध्ये दलित, आदिवासी आणि गरीब नाही तरीसुद्धा कोट्यवधींची कर्जे यांना माफ केली जातात. यामुळे मोदी सरकार गरिबांचे नाही तर अदानी व अंबानी यांच्यासाठी सत्तेवर आले आहे. त्यांना या निवडणुकीतून हद्दपार केले पाहिजे तरच देश सुरक्षित राहील आणि गरिबी हटण्यासाठी मदत होईल, असे राहुल गांधी या वेळी बोलताना म्हणाले.
या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading