fbpx
Sunday, May 26, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि एकवीस लाख रूपये जिंका ! अंनिसचे ज्योतिषांना जाहीर आव्हान !

पुणे : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. महाराष्ट्रात आणि देशात होणाऱ्या विविध स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत प्रत्येक निवडणुकीवेळी ज्योतिषी वर्तवत असतात. अनेक राजकीय नेते देखील ह्या फसवणुकीला बळी पडतात, त्यामुळे अज्ञानी आणि भाबडया लोकांच्यात गैरसमज पसरतात आणि अंधश्रध्दा निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे अशी माहिती डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मिलिंद देशमुख, प्रकाश घादगिने, विनोद वायगणकर, प्रवीण देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे दिली आहे. त्यासाठीची आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली देखील महाराष्ट्र अंनिसने जाहीर केली आहे. हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे.

काय आहे आव्हान प्रश्नावली :
सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीही अंनिसमार्फत ही आव्हान प्रक्रिया लोकप्रबोधनाचा हेतू नजरेसमोर ठेवून राबवली जात आहे. जे ज्योतिषी या आव्हान प्रक्रियेत सहभागी होतील, त्यांना समितीमार्फत एक प्रश्नावली दिली जाईल. या प्रश्नावलीमध्ये अंनिसने ज्योतिषांना काही प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये टी.शैलजा, नितीन गडकरी, राहुल गांधी, महुआ मलहोत्रा, कंगना राणावत यांना किती मते पडतील ? तसेच कलकत्ता उत्तर, नालंदा, रायपूर, बारामती, आग्रा, बेल्लारी या मतदार संघातून कोण विजयी होईल ? वाराणसी, बुलढाणा, चांदणी चौक, लडाख, वेल्लोर, भुवनेश्वर या मतदारसंघात सगळ्यात कमी मते कोणाला पडतील ?
संपूर्ण भारतात सर्वांत कमी मते कोणत्या उमेदवाराला पडतील ? कोणत्या मतदारसंघात नोटाला जास्त मतदान होईल ? पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य किती उमेदवारांना मिळेल ? या प्रश्नांची अचूक उत्तरे ज्योतिषांनी देणे अपेक्षित आहे.

भविष्य कसे वर्तवले ते सांगा :
राजकीय भविष्य सांगण्यासाठी कोणती ज्योतिष पद्धत वापरली यांची माहिती ज्योतिषांनी देणे अत्यावश्यक आहे. उदा. उमेदवाराची जन्म कुंडली, हस्तरेषा शास्त्र, अंकशास्त्र, टॅरो कार्ड, राशीभविष्य, नाडी भविष्य, होरा शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धत, प्राणी पक्षी यांचा वापर करून वर्तवलेले भविष्य किंवा अर्ज भरताना काढलेला मुहूर्त, प्रचाराचा काढलेला शुभ मुहूर्त, उमेदवाराच्या नावातील अद्याक्षरे.

प्रश्नावली आणि गुण पध्दत :
या प्रश्नावलीत एकूण चार प्रमुख प्रश्न असून प्रत्येक प्रश्नांच्या अंतर्गत काही उपप्रश्न आहेत. प्रत्येक योग्य उत्तरला पाच गुण देण्यात येतील. एकूण शंभर गुण अशी या प्रश्नावलीची रचना आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना ते उत्तर ज्योतिषाची कोणती पद्धत आणि कशी वापरून काढले याची सविस्तर माहिती देणे अत्यावश्यक आहे. या माहितीसाठी अर्धे गुण असतील आणि अर्धे गुण उत्तरासाठी असतील.

आव्हान प्रक्रिया काय आहे ?
या आव्हान प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवेशिका, उत्तरासहित अधिकृत प्रश्नावली आणि ‘अंधश्रध्दा निर्मूलन समिती, महाराष्ट्र’ या नावे काढलेला रूपये ५००० (रूपये पाच हजार) प्रवेश शुल्काचा धनाकर्ष (डी.डी.) सीलबंद पाकीटातून दि. २५ मे २०२४ पर्यंत रजिस्टर पोस्टाने कार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर, सांगली – 416416. फोन नंबर – 0233-2312512 पत्त्यावर मिळणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने अधिकृतपणे सर्व निकाल त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर दोन आठवडयाच्या आत परीक्षक समितीच्यावतीने योग्य तो अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल.

ज्योतिषांना ग्राहक संरक्षण कायदा लागू करा!
या पार्श्वभूमीवर फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्या ज्योतिषांना ग्राहक संरक्षण कायदा लागू करा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे वर्तविलेले भविष्य खरे ठरले नाही, तर नुकसान भरपाई मिळण्याची संधी ग्राहकाला उपलब्ध राहील. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसने दिलेले आव्हान ज्योतिषांनी वर्तविलेल्या भविष्याचा खरेपणा सिद्ध करण्याची संधी मानून स्वीकारावे, असे जाहीर आवाहन या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

ज्योतिषाबद्दल अंनिसची भूमिका :
‘फलज्योतिष हे शास्त्र नाही; ते थोतांड आहे’ ही भूमिका घेवून गेली अनेक वर्षे महाराष्ट्र अंनिस लोकांचे प्रबोधन करत आहे. गेल्या अनेक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मध्ये महाराष्ट्र अंनिस मार्फत ज्योतिष व्यावसायिकांना आव्हान देण्यात आले होते पण प्रत्यक्षात ते स्वीकारण्या साठी एकही ज्योतिषी पुढे आला नाही असे देखील या पत्रकात नमूद केले आहे.
लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून चमत्कार करणाऱ्या आणि फलज्योतिष सांगणाऱ्या बुवाबाबांनी केलेल्या फसवणुकी विरोधात महाराष्ट्र अंनिस गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत आहे.
चमत्कार आणि फलज्योतिष यांच्यामधला फोलपणा महाराष्ट्र अंनिसने आपल्या शास्त्रीय मांडणीतून सिद्ध केला आहे. फलज्योतिष व बुवाबाजीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन समाजाचे आर्थिक, समाजिक, लैंगिक शोषण होऊ नये, यासाठी संघटनेने चमत्कार आणि फलज्योतिषाची वारंवार शास्त्रीय चिकित्सा केली आहे. या चिकित्सेमागे फलज्योतिषातील अवैज्ञानिक बाजू समाजासमोर यावी, असा प्रयत्न राहिलेला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading