Sunday, September 20, 2026
Latest NewsPUNE

भगवान महावीरांच्या विचारात विश्व कल्याणउपाध्याय प पू प्रवीण ऋषी जी महाराज

पुणे : सत्ता आणि शास्त्राच्या आधारे विजय मिळवणारे जगात खूप देश आहेत, परंतु भगवान महावीर हे असे नाव आहे ज्यांनी सत्याच्या आधारे विजय मिळवला. त्यामुळे ते सर्वांपेक्षा खूप अनोखे आणि वेगळे आहेत. सर्व धर्म आम्ही श्रेष्ठ असल्याचा दिंडोरा पिटतात, त्यातूनच विश्वाचे कल्याण आहे असे संदेश देतात, परंतु या विचारांना शेवटपर्यंत पोहोचवणारे भगवान महावीरच आहे. विवेकच धर्म आहे आणि त्यातूनच विश्वकल्याण आहे. विवेक हाच धर्म असून ही प्रस्तुती तात्पुरती न घेता निरंतर घडली पाहिजे. महाविरानी आपल्याला भोजनातूनही अहिंसा शिकवली आहे, कर्तव्य आज एक उद्या वेगळे आहेत त्यामुळे निरंतर कार्य महत्त्वाचे. जगासमोर महावीर पर्याय म्हणून पुढे येऊ देऊ नका, महावीरांचे विचार हे एका दिवसासाठी नसून ते 365 दिवस निरंतर चालणारे आहेत. यावेळी महाराजांनी हिंदी विवेक मासिक पत्रिकेचे तोंड भरून कौतुक केले व भगवान महावीरांचे विचार एका दिवसापुरते सीमित न राहता निरंतर वेळोवेळी जगासमोर आणण्याचे आवाहन केले. महावीरांचे दिव्य दृष्टिकोन जगासमोर पोहोचले पाहिजेत यासाठी हिंदी विवेकने आपले कार्य चालू ठेवावे, असे सांगितले.

तीर्थंकर भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण वर्षानिमित्त  ‘तीर्थंकर भगवान महावीर’ विशेषांकाचे प्रकाशन पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी कार्यक्रमाला उपाध्याय प. पू. प्रवीण ऋषि जी महाराज, रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, हिंदुस्थान प्रकाशनचे रमेश पतंगे, विशालकुमार चोरडिया, पोपटलाल ओसवाल, राजेंद्र बाठिया तसेच जैन समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

यावेळी बोलताना सुनील आंबेकर म्हणाले, कित्येक विषयांचे अचूक अध्ययन करून सतत विवेकच्या माध्यमातून समाजासमोर वेगळे विषय ठेवले जातात. आजचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, 2550 वर्षानंतरही या दिवसाची महानता लक्षात येते. शेकडो वर्षांपूर्वी दिलेले विचार आजही जिवंत आहेत येणाऱ्या समस्यांचे समाधान हवे असेल तर महावीरांच्या विचारांवर चालले पाहिजे. मानव कल्याणासाठी केलेली तपस्या जन्मोजन्मातर ची साधना त्यातून या मार्गांचे निर्माण झाले आहे. राष्ट्राची साधना हजारो वर्षांची आहे. विदेशींच्या आक्रमणात संत महात्म्यांनी आपल्या विचारातून राष्ट्राला मजबूत बनवले. आपल्या पूर्वजांनी मानव कल्याणच्या या विचारांवर विश्वास ठेवून विदेशी संकटांपासून राष्ट्राला वाचवले. संघर्ष काळात राष्ट्राच्या जीवन मूल्यांना आत्मसात केले या मूल्यांना आत्मसात केल्यानेच व्यक्ती चरित्रवान होतो. 


प्रमुख पाहुणे, वरिष्ठ लेखक पद्मश्री रमेश पतंगे यांनी जैन समाजाचे महत्व सांगितले. प्रत्येक देशाचे एक वेगळी ओळख असते अमेरिका भौतिक साधन संपन्न देश आहे, ब्रिटनला मदर पार्लमेंट म्हणतात अशाच प्रकारे भारताला मात्र धर्मभूमी म्हणून ओळखली जाते. ती टिकवून ठेवण्यासाठी संत महात्म्यांनी मोठे योगदान दिले. वेद काळापासून आजपर्यंत धर्मभूमी बनवून ठेवण्यात महावीरांचे कार्य अग्रणी आहे. राष्ट्रीय व्यक्तित्व बनवण्यासाठी महापुरुषांचे योगदान मोठे आहे. यावेळी पद्मश्री पतंगे यांनी भगवान महावीरांच्या विचारांवर चालणाऱ्या अहिंसा विचाराचे महत्व विशद केले. संविधानातील आर्टिकल 21 आपल्याला कशा प्रकारे महत्त्वपूर्ण आहे हे सांगितले. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणाचीही हत्या करता येत नाही. प्रत्येकाने अहिंसेचे पालन केले पाहिजे हे भगवान महावीरांचे विचार आजही संविधानाच्या माध्यमातून आपल्या समोर आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पल्लवी अनवेकर यांनी केले. आभार प्रशांत मानकुमरे यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading