Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

वंचितचा काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा; मात्र कॉँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा दिला. तर शरद पवार गटाला बारामतीत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात महाविकास आघाडी अकोल्यातून उमेदवार देणार नाही, अशी चर्चा होती. परंतु काँग्रेसने अकोल्यातून उमेदवार दिला. पवार काँग्रेसचे मन वळवतील असे सांगितले जात होते. पण आज झालेल्या जागावाटपात काँग्रेसने अकोल्यात आपला उमेदवार कायम ठेवला आहे. त्यामुळे अकोल्यात महाविकास आघाडी आंबेडकरांना टक्कर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, अखेर महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाले आहे. त्यानुसार ठाकरे गट सर्वाधिक २१ जागा लढवणार आहे. तर काँग्रेस १७ आणि शरद पवार गट १० जागा लढवणार आहे. या जागावाटपात समाजवादी पार्टी, माकप, शेकाप आणि इतर मित्र पक्षांना एकही जागा देण्यात आलेली नाही. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही मतदारसंघात महाविकास आघाडी पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांना प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत विचारण्यात आले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सविस्तर उत्तर दिले. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न होता. संविधान वाचवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो होतो. पण काही गोष्टी पुढे गेल्या नाहीत. त्यामुळे आमची त्यांच्यासोबत आघाडी होऊ शकली नाही. पण पुढच्यावेळी आम्ही एकत्र येण्याचा नक्की प्रयत्न करू. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आम्ही काहीही बोलणार नाही हे मी मागेच सांगितले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading