Lok Sabha Election 2024 : एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार असलेले एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज स्वतः एकनाथ खडसे यांनी माध्यमांना ही माहिती दिली. त्यामुळे खडसेंची पुन्हा घर वापसी होणार हे नक्की असून लवकरच अधिकृत भाजप पक्ष प्रवेश होणार आहे.
मागील काही दिवसांपासून एकनाथ खंडसे राष्ट्रवादी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देवून पुन्हा भाजप मध्ये पक्ष प्रवेश करणार याबाबत चर्चा होत्या. त्यात काही दिवसांपूर्वीच खडसे दिल्लीत जावून आल्याने या चर्चांना अधिकच महत्व आलं होत. मात्र आज स्वतः एकनाथ खडसे यांनी आपण पुन्हा भाजप मध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच रात्री पर्यंत पक्ष प्रवेश कधी होणार याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल असे देखील सांगितले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यां सोबत चर्चा करून एकनाथ खडसे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. परंतु त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे आता रोहिणी खडसेंच्या पदाबद्दल शरद पवार हे काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल.
