fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

व्हॅम्निकॉमकडून संपूर्ण महाराष्ट्रातील ६१५० पेक्षा अधिक सहकारी संस्थांना दिले प्रशिक्षण

पुणे : सहकारी संस्था प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय परिषद (एनसीसीटी) या संस्थेच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय संस्था असलेल्या व्हॅम्निकॉमने २०२३ -२४ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील सहकारी संस्थांशी संबंधित ६१५६ व्यक्तींना प्रशिक्षण दिले आहे. यांमध्ये १०१८ महिलांचा समावेश आहे.

सहकार मंत्रालयाच्या उपक्रमांना अनुसरून पुण्याच्या व्हॅम्निकॉमने २०२३-२४ मध्ये व्यापक संपर्क कार्यक्रम हाती घेतला. या अंतर्गत प्रमुख भागधारकांना सामील करून घेत संपूर्ण देशभरात कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच महिला व दुर्बल घटकांसहित समाजाच्या सर्व वर्गांना समाविष्ट करून घेण्यात आले.

एनसीसीटी ही सहकार मंत्रालयाने प्रवर्तित केलेली एक स्वायत्त संस्था आहे. व्हॅम्निकॉमने (वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था) १५ राज्यांमध्ये विविध कार्यक्रम घेतले. यात एकूण १०५८३ व्यक्ती सहभागी झाल्या, त्यांपैकी ४० टक्के महिला होत्या. त्यांना सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबाबत प्रशिक्षण पुरविण्यात आले. प्रशिक्षण प्राप्त करणाऱ्या सहभागी व्यक्तींची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात होती. त्या खालोखाल गुजरात, केरळ, झारखंड, कर्नाटक, तेलंगाना, जम्मू–काश्मीर, पश्चिम बंगाल, हरियाणा, छत्तीसगड, आसाम, ओडिशा, राजस्थान, बिहार आणि तमिळनाडू यांचा क्रमांक होता.

भारतातील सहकारी संस्थांचे उन्नयन’ यावर व्हॅम्निकॉमने प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात व्हॅम्निकॉमच्या संपर्क कार्यक्रमांत एकूण 6,156 व्यक्ती सहभागी झाल्या. यांमध्ये १०१८ महिला आणि ५१३८ पुरुष होते.

अहवालात दिलेल्या माहितीप्रमाणे, “या ५१३८ पुरुषांपैकी ६९ टक्के खुल्या वर्गातील तर १९ टक्के अन्य मागासवर्गीयांमधील होते. अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक आणि भटक्या विमुक्त जमातींमधील अगदी थोडे जण यात सहभागी झाले असून त्यांची टक्केवारी अनुक्रमे ७ टक्के, ३ टक्के आणि २ टक्के होती.”

महाराष्ट्रातील संचालक मंडळ, व्यवस्थापन, शेतकरी सभासद तसेच सहकारी संस्थांमधील अन्य भागधारकांसाठी क्षमता निर्मिती कार्यक्रम घेण्यात आले. या अहवालात म्हटले आहे, “सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी सहकार मंत्रालयाने राबविलेल्या नवीन उपक्रमांबाबत जनजागृती पसरविण्याचे कार्य या कार्यक्रमांनी केले.”

व्हॅम्निकॉमच्या कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये कृषी, विपणन, पतसंस्था व बँकिंग, मत्स्यपालन आणि प्राथमिक कृषी पतसंस्था (पीएसीएस) यांचा समावेश होता.

जम्मू कश्मीर, राजस्थान, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडु, तेलंगाणा, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम या १५ राज्यांमध्ये व्हॅम्निकॉमचा संपर्क कार्यक्रम राबविण्यात आला.

व्हॅम्निकॉमची स्थापना १९४८ साली मुंबईत झाली व नंतर तिचे स्थलांतर पुण्याला झाले. कल्याणकारी राज्याच्या प्रसारासाठी सहकारी संस्थांचे महत्त्व ओळखून सहकारातून समृद्धी हे स्वप्न साकार करण्यासाठी भारत सरकारने ६ जुलाई २०२१ रोजी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती केली.

सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यानंतर या मंत्रालयाने अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सहकाराचा लाभ मिळवून देण्यासाठी असंख्य उपक्रम राबविले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading