आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी Good News
मुंबई : महाराष्ट्रात आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तरुणांची संख्या जास्त असून शहरी व ग्रामीण भागात आजही असे विवाह झाल्यानंतर ऑनर किलींगच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. त्यामुळे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना राज्य शासनातर्फे सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनातर्फे सुरक्षा गृह पुरवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एच.नागरगोजे यांनी दिली आहे.
सुरुवातीला एक महिन्यासाठी नाममात्र शुल्कावर सुरक्षागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जास्तीत – जास्त एका वर्षापर्यंत सुरक्षागृह उपलब्ध करून देण्यात येईल. या सुरक्षागृहाची व्यवस्था समाज कल्याण विभागामार्फत पुरवण्यात येणार आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
तरी ऑनर किलींग प्रकरणात त्रस्त असणाऱ्या जोडप्यांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.
दरम्यान, मुंबई उपनगरात सुरू करण्यात येणाऱ्या या सुरक्षा गृहा प्रमाणे राज्यभरात देखील असे उपक्रम सुरू होतील अशी अपेक्षा आहे.
