डिझायनिंग हे केवळ शिक्षण नसून ती एक जीवनपद्धती आणि सरावाचा भाग – डॉ गीता नारायणन
पुणे : डिझायनिंग हे केवळ औपचारिक शिक्षणाचे क्षेत्र नसून ती एक जीवनपद्धती आहे, असे प्रतिपादन बंगळूरू येथील सृष्टी स्कूल ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजीच्या संस्थापक – संचालिका आणि डिझाईन क्षेत्रातील एक महत्त्वाच्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ गीता नारायणन यांनी केले. डिझाईन क्षेत्रात सराव खूप महत्त्वाचा असल्याचेही त्या म्हणाल्या.
असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) च्या वतीने आयोजित १८ व्या पुणे डिझाईन फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी डॉ नारायणन यांचा डिझाईन क्षेत्रातील योगदानासाठी यावर्षीच्या ऑनररी फेलो पुरस्काराने सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) चे राष्ट्रीय अध्यक्ष ए बालासुब्रमण्यम आणि एडीआयच्या पुणे विभागाचे अध्यक्ष योगेश दांडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नगर रस्त्यावरील हयात रिजन्सी या ठिकाणी सदर महोत्सव संपन्न झाला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझाईन या विषयात होत असलेले काम, डिझाईनचे आयाम, नजीकचे भविष्य, या क्षेत्रातील अनेकविध विषयांवर चर्चा, कार्यशाळा यांचा लाभ उपस्थितांनी यावेळी घेतला. ‘व्हर्सेस’ अर्थात डिझाईन क्षेत्रातील बहुआयामी विरोधाभास अशी या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात इसाबेला चॉव यांच्या ‘हाँगकाँग – डिझाईन सेंटर – डिझाईन फॉर एशिया’ या विषयावरील व्याख्यानाने झाली. इसाबेला यांनी यावेळी हाँगकाँग मधले डिझाईन कल्चर उलगडून दाखविले. यानंतर डॉ गीता नारायणन यांचे बीजभाषण संपन्न झाले. आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल डॉ नारायणन यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना डॉ गीता नारायणन म्हणाल्या, “मी स्वतः डिझाईन या विषयात औपचारिक शिक्षण घेतले नाही. मात्र कालांतराने मी या क्षेत्राच्या प्रेमात पडले. भारतातील अनेक डिझायनर्स कडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. आज भारतातील डिझायनिंग क्षेत्र हे जगातील अनेक विकसनशील देशांसाठी प्रेरणादायी असून डिझाईन या क्षेत्रातील नवा आयाम आपण त्यांना दिला आहे. एनआयडी, एनआयएफटी आणि आयआयटी या संस्थांनी आज देशाला जगातील सर्वोत्तम डिझायनर दिले आहेत.”
आजच्या डिझायनर्सच्या नव्या पिढीला मार्गदर्शन करताना डॉ नारायणन पुढे म्हणाल्या की, “डिझायनर्सनी आज स्वतः चे स्टार्टअप सुरू करण्यावर भर द्यावा. ठोकताळ्याच्या बाहेर पडून विचार करावा.
नवकल्पनांचा शोध घ्यावा, स्वतः चा शोध घ्यावा आणि सरावाला महत्त्व देत काम करीत राहावे. या क्षेत्रातील मायक्रो कम्युनिटी तयार करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत करावे. स्वतः डिझायर हेच या क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवून आणू शकतात.”
यानंतर ‘इग्नायटिंग इम्पॅक्ट’ या विषयावर संतोष खवले यांनी देशी वाणांचे जतन करण्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्याशी संवाद साधला.
राहीबाई यांनी यावेळी आपला प्रवास उपस्थितांसमोर उलगडून दाखवीत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “शाश्वतता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. आज गावठी बियाणे हे सोने असले तरी ते सावत्र असल्यासारखे मागे टाकले जात आहे. मी निसर्गाच्या शाळेत शिकले, मोठी झाले. आज असेच मातीसोबत पुढच्या पिढीचे नाते कसे तयार होईल हे पाहायला हवे. जोवर प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न येत नाही तोवर माझे ध्येय पूर्ण होणार नाही.”
“मी शिक्षण घेतले नसले तरी माझ्या वडीलांनी आम्हा भावंडांना समाजात कसे वागावे, स्वतः पायावर कसे उभे रहावे याचे ज्ञान दिले. त्याचा उपयोग आजवर झाला. समाजासाठी काहीतरी करायचे ही माझी कायमच इच्छा होती. देशी बियाणांची बँक आणि देशी वाणांसंदर्भात काम करताना ती इच्छा पूर्ण होत आहे याचा आनंद आहे. आज मी १५० गावांमध्ये शेतकऱ्यांसोबत काम करते, महिला बचत गटाच्या माध्यमातून ३५०० हून अधिक महिलांसोबत काम करीत आहे. १६० देशी वाणांची बँक मी तयार केली आहे.”
प्रत्येकाच्या घरात आज रसायनयुक्त विषारी पालेभाज्या आणि अन्न येत आहे. हे थांबवायचे असेल तर स्वतः पासून सुरुवात करीत शाश्वततेचा वसा जपायला हवा आहे, असेही राहीबाई पोपेरे म्हणाल्या.
