खोके भरो, रस्ता करो ! मिल कॉर्नर ते लिटिल फ्लॉवर सिमेंट रोड
छत्रपती संभाजीनगर : मिल कॉर्नर, लक्ष्मीकॉलनी, छावणी, पडेगाव, नंदनवन कॉलनी,चांदमारी, शांतीपुरा, भीमनगर, भावसिंगपुरा, पेठेनगर, निसर्ग कॉलनी, कासंबरी दर्गा भागातील नागरिकांनी वेठीस धरून चांगला रस्ता उखडून टाकत सिमेंटचा रस्ता करण्याचा घाट घातला जात आहे. असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम यांनी केला आहे.
मकई गेट ते टाऊन हॉल रस्त्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही, पाणचक्की चा रस्ता गेट मुळे अरुंद आहे, बाबा पेट्रोल पंप ते लोखंडी पुलाचा रस्ता प्रचंड वाहतुकीमुळे अडचणींचा आहे.
या मार्गावरील मराठी हॉलिक्रॉस, लिटिल फ्लॉवर,मिलिंद मल्टिपर्पज, इंग्लिश हॉलिक्रॉस, सेव्हथ डे, क्राईस्ट चर्च हायस्कुल, रेजिमेंटल स्कुल, छावणी परिषद शाळा यांच्यासह नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा, पडेगाव भागातील शाळेत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थी या मुळे वेठीस धरले जाणार आहेत.
मिलिंद कॉलेज, डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय, पिईएस इंजिनिअरिंग- पॉलिटेक्निक, डॉ.आंबेडकर कॉलेज आणि विद्यापीठातील हजारो विद्यार्थी असे लाखो नागरिकांना अडचणीत टाकत हा चांगला रस्ता सिमेंट चा करण्याचे कार्यसम्राट लोकप्रतिनिधी यांचे धोरण आहे.
मुळात जुना रस्ता अजून सुस्थितीत आहे, पर्यायी रस्ते नादुरुस्त- निमुळते, प्रचंड रहदारीचे आहेत, कुणाची तक्रार नाही, मागणी नाही, ठेकेदाराकडून जुन्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचा मार्ग अजून बंद झालेला नाही मग केवळ ठेकेदाराला पोसायचे टक्केवारी मिळवायची हा एक कलमी कार्यक्रम या मागे आहे का ?
लाखों लोकांना वेठीस धरायचे अन पुन्हा मतांचा जोगवा मागायचा, शेकडो वसाहती आजही रस्ते, ड्रेनेज विकासकामे यांच्या प्रतीक्षेत आहेत, दांडगा जनसंपर्क सांगणारे आमदार साहेब दर्शन दुर्लभ झाले आहेत लवकरच लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे, विधानसभेची घोडदौड सुरू होईल लाखों लोकांना वेठीस धरून खोके भरणारे नेते पुन्हा आपल्या दारात येतील अन विकासाचे दाखले देतील आम्ही मात्र मुकाट सहन करत राहू.असे सचिन निकम यांनी म्हटले आहे.
