समर खंडेलवाल, पिनाक आनप, सुरज राठी, कृष्णराज अरकोट अंतिम १६ खेळाडूत !!
पुणे : डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत डेक्कन जिमखानाच्या समर खंडेलवाल, पिनाक आनप, पुना क्लबच्या सुरज राठी आणि कृष्णराज अरकोट या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत चुरशीच्या झालेल्या सामन्यात समर खंडेलवाल याने प्रसाद दाते याचा ११-५३, २४-३२, ७५-१५, ३०-१७, ६२-२८ असा संघर्षपूर्ण पराभव केला. पहिल्या दोन फ्रेमच्या पिछाडीनंतर समर याने सलग तीन फ्रेम ७५-१५, ३०-१७, ६२-२८ अशा जिंकून सामन्यात विजय मिळवून अंतिम १६ खेळाडूंमध्ये आपले स्थान निश्चित केले. पिनाक आनप याने आशिष हुले याचा ६०-२२, ०८-४२, ५९-१८, ३९-०९ असा पराभव करून विजयी कामगिरी केली. पुना क्लबच्या सुरज राठी याने फैजल सय्यद याचा ६५-०६, ३८-०४, ६३-१९ असा सरळ फ्रेममध्ये पराभव केला. कृष्णराज अरकोट याने रोहन साकळकर याचा ५०-१६, २८-२१, ०८-६६, ८४-२६ असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेत आजपासून बाद फेरीला सुरूवात झाली. साखळी फेरीमधून बाद फेरीमध्ये ३२ खेळाडू पात्र ठरले. अभिजीत मोरे, कैवल्य जाधव, आरव संचेती, हृषीकेश इंगळे, शोएब गर्ग, विग्नेश संघवी, जेसन मल्होत्रा, वैभव मालखेडे, बापू गायकवाड, अश्विन पळनीटकर, अमोघ बंदीचोडे, अभिषेक लोखंडे, आशिष हुले, पिनाक अनाप, अमरदीप घोडके, रोहीत रावत, लियाकत शेख, आनंद रघुवंशी, कृष्णराज अरकोट, रोहन साकळकर, सचिन बिचे, सोनु मातंग, अभिजीत रानडे, मनोज गाडगीळ, प्रसाद दाते, समर खंडेलवाल, महेश जगदाळे, नितेश माने, मुदस्सर खान आणि विजय नचानी यांनी बाद फेरी गाठली.
उद्यापासून ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ ज्युनिअर गटाच्या स्पर्धेचे सामने सुरू होणार आहे. यामध्ये अर्थव साठे, ओवेस शेख, आर्यन मारभाल, आर्यन खान, राजवीर राजध्यक्ष, आरव संचेती हे खेळाडू सहभागी झाले आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये या गटाचे सामने होणार आहेत. विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना करंडक आणि मेडल्स् देण्यात येणार आहेत.
सामन्यांचे सविस्तर निकालः बाद फेरीः
सचिन बिचे पुढे चाल वि. सोनु मातंग;
समर खंडेलवाल वि.वि. प्रसाद दाते ११-५३, २४-३२, ७५-१५, ३०-१७, ६२-२८;
पिनाक आनप वि.वि. आशिष हुले ६०-२२, ०८-४२, ५९-१८, ३९-०९;
सुरज राठी वि.वि. फैजल सय्यद ६५-०६, ३८-०४, ६३-१९;
कृष्णराज अरकोट वि.वि. रोहन साकळकर ५०-१६, २८-२१, ०८-६६, ८४-२६.
