Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

मसाप आणि धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त कार्यक्रम.                                 

पुणे : दैनंदिन जीवन व्यवहारात आपण माय मराठीचा अधिकाधिक  वापर बोलताना आणि लिहिताना  केला पाहिजे. आपले भाषाप्रेम कृतीतून व्यक्त व्हावे अशी अपेक्षा  पुणे विभागाचे धर्मादाय   सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालनालय, धर्मादाय सह आयुक्त, पुणे विभाग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन  पंधरवड्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.   धर्मादाय उपआयुक्त राहूल मामू,  धर्मादाय सहायक आयुक्त डॉ राजेश परदेशी, श्रीमती पुणसे, पी. पी. चव्हाण, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्यवाह प्रमोद आडकर, माधव राजगुरु यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात कवी बंडा जोशी, अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर यांनी हास्य कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

बुक्के म्हणाले, “भाषा प्रेमाच्या जोडीला संवेदनशीलता असेल तर माणसे जोडण्याचे कामही त्यातून होईल. अन्य भाषांवर प्रेम करताना मराठीकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी.”  प्रा जोशी म्हणाले, “भाषा  केवळ संवादाचे माध्यम नसते, ती लोकशक्तीचा श्वास असते. भाषा आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनात उमटतात नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकटतात. आपले भाषाप्रेम आंतरिक जाणिवातून प्रकट व्हायला हवे. ते झाले तर भाषा आणि संस्कृती टिकण्याची चिंता करावी लागणार नाही.” सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. माधव राजगुरु यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading