khelo india youth games : महाराष्ट्राची आज डझनभर पदकांची कमाई!
कुस्ती, वेटलिफ्टिंग, जलतरण, नेमबाजीत पदकांची लयलूट
चेन्नई : महाराष्ट्राच्या खेळाडूनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील आपला पदकांचा धडाका कायम ठेवताना कुस्ती, वेटलिफ्टिंग, जलतरण व नेमबाजी या प्रकारांत पदके मिळविली. याचबरोबर खो-खो आणि टेनिसमध्ये देखील खेळाडूंनी आपापले सामने जिंकताना स्पर्धेतील आपली दमदार वाटचाल सुरूच ठेवली आहे. महाराष्ट्राने शनिवारी कुस्तीमध्ये १ सुवर्ण, २ कांस्य, वेटलिफ्टिंगमध्ये २ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य, जलतरणमध्ये १ सुवर्ण, २ रौप्य, तर नेमबाजीत १ कांस्य अशी एकूण डझनभर पदकांची कमाई केली.
जलतरणात ऋजुताची सोनेरी सुरुवात तर अदिती, सलील यांना रौप्य
महाराष्ट्राच्या ऋजुता राजाज्ञ हिने ५० मीटर्स बटरफ्लाय शर्यत जिंकून जलतानाच्या पहिल्या दिवशी सोनेरी सुरुवात करून दिली. तसेच अदिती हेगडे व सलील भागवत यांनी रौप्यपदकाची कमाई करीत झकास सलामी केली. ऋजुता हिने पन्नास मीटर्स बटरफ्लायचे अंतर २९.१८ सेकंदात पार केले. ती पुण्याची खेळाडू असून तिला अमोल सावरकर व एस व्ही कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
नाशिकची खेळाडू अदिती हिने २०० मीटर्स शर्यत दोन मिनिटे १२.३० सेकंदात पार करीत रूपेरी यश मिळवले. तिने शालेय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक केली होती. मुलांच्या गटात सलील भागवत याने ५० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदक मिळविताना २५.७३ सेकंद वेळ नोंदवली. आसामच्या जनंजय हजारीका याने ही शर्यत २५.५३ सेकंदात जिंकली.


—
वेटलिफ्टिंग मध्ये आरती हिची सोनेरी कामगिरी
महाराष्ट्राच्या आरती तळगुंडी हिने ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले तर तिची सहकारी सौम्या दळवी हिने कांस्यपदक पटकाविले. इचलकरंजी ची खेळाडू आरती हिने स्नॅचमध्ये ७५ किलो तर क्लीन व जर्क मध्ये ९५ किलो असे एकूण १७० किलो वजन उचलले. तिचे हे या स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. सौम्या हिने स्नॅचमध्ये ७५ किलो तर क्लीन व जर्क मध्ये ९० किलो असे एकूण १६५ किलो वजन उचलले. सौम्याने ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. तिला तिचेच वडील व शिव छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू सुनील दळवी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आसामच्या पंचमी सोनोवाल हिने १६७ किलो वजन उचलून रुपेरी कामगिरी केली.

पुण्याच्या सौरभ जाधवला ९२ किलो फ्रीस्टाईल गटात कांस्यपदक
चेन्नई येथे राजा रथीमल स्टेडीयम येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील कुस्तीच्या फ्रीस्टाईल प्रकारात पुण्याच्या सौरभ जाधवने ९२ वजनीगटात कांस्यपदकाची कमाई केली. स्पर्धेदरम्यान दुखापत होवून देखील झुंझ देणाऱ्या सौरभला यावेळी कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. सौरभ पुण्यातील शिवरामदादा तालीम येथे सराव करत असून त्याला हिंद केसरी अभिजित कटके यांचे मार्गदर्शन मिळत आहे. दुखापतीमधून लवकरात लवकर सावरून, पुन्हा नव्या दमाने सरावाला सुरुवात करण्याचा मानस यावेळी सौरभ जाधव बोलून दाखविला.
—–
कुस्तीत कोल्हापूरच्या समर्थ म्हाकवेला सुवर्ण
कोल्हापूरच्या समर्थ म्हाकवेने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कुस्तीतील ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने ७२ किलो गटातील सुवर्णपदकच्या लढतीत छत्तीसगढच्या अभिषेक निषादला ८-० गुण फरकाने लोळविले.
अंतिम लढतीत अभिषेकला २ वेळा पॅसिव्ह मिळाले, त्याचा फायदा समर्थला झाला. मोक्याच्या क्षणी समर्थने थ्रो होल्डिंग करताना चार गुणाची कमाई केली. त्यामुळे समर्थला ६-० अशी भरभक्कम आघाडी मिळाली. समर्थने चपळाईने भारंदाज डाव टाकून पुन्हा २ गुण वसूल करत लढतीत निर्विवाद वर्चस्वासह सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली.
यापूर्वी देखील त्याने खेलो इंडिया स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. मात्र, यावर्षी जास्त सराव, मेहनत आणि प्रशिक्षण घेवून त्याने पदकाचा रंग बदलविला. पट्टणकोडोली, तालुका हातकानंगले, येथील असणार्या समर्थचे वडील टेम्पोचालक, तर आई शासनाच्या शाळेतील पोषण आहार तयार करणारी स्वयंपाकी आहे. अशा बेताच्या परिस्थितीतून आलेल्या समर्थला पहिल्यापासून कुस्तीचे वेड होते. त्याने सोमनाथ कामान्ना यांच्याकडे कुस्तीचे प्राथमिक धडे गिरवायला सुरुवात केली. एक एक पायरी चढणार्या समर्थने अनेक शालेय, विभागीय तथा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावली आहे. समर्थ सध्या ‘साई’मध्ये अमोल यादव यांच्याकडून कुस्तीचे मार्गदर्शन मिळवत आहे.

आदित्य ताटेला कांस्य
समर्थ म्हाकवेच्या आधी आदित्य ताटेने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील कुस्तीमध्ये महाराष्ट्राला कांस्यपदक जिंकून दिले. त्याने चूरशीच्या लढतीत झारखंडच्या बख कांचपवर ६-५ असा एका गुणाने निसटता विजय मिळवित पदकाला गवसणी घातली. उपांत्य लढतीत हरियाणाच्या अमरदीपकडून पराभव झाल्याने या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या आदित्य ताटेचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. मात्र, कांस्यपदकाच्या लढतीत त्याने झारखंडचा तगडा मल्ल बख कांचपचे आव्हान मोडीत काढत महाराष्ट्राच्या झोळीत एक पदक टाकले. बाणगे (कागल, कोल्हापूर) या छोट्याशा गावातील आदित्य ताटेने तुकाराम चोपडे व रवींद्र पाटील यांच्याकडून कुस्तीचे प्राथमिक धडे घेतले होते. सध्या एनआयएस प्रशिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य दोनवडे येथे सराव करत असतो. कुरूंदवाड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आदित्य ताटेने सुवर्णपदक जिंकले होते. भावाच्या खेळाने प्रभावीत होऊन आदित्यची बहिण गायत्री ताटेही आखाड्यात उतरली. तिनेही राष्ट्रीय शालेय स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.
महादेव वडार याने वेटलिफ्टिंगमध्ये ‘सोने’ उचलले
महाराष्ट्राच्या महादेव वडार याने मुलांच्या ६७ किलो गटात २५३ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी त्याने स्नेच मध्ये ११३ किलो तर क्लीन व जर्क मध्ये १४० किलो वजन उचलले. तो मूळचा कोल्हापूरचा असून गेली पाच सहा वर्षे पुण्यातील क्रीडा प्रबोधिनी मध्ये उज्ज्वला माने व वसीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
आज क्लीन व जर्क मध्ये त्याने १४० किलो वजन उचलण्याचा निर्धार केला होता त्यावेळी बाकीचे सर्वजण त्याच्यापेक्षा कमी वजनच उचलणार होते त्यामुळे त्यांनी पहिला प्रयत्न यशस्वी केला तरी त्याचे सुवर्णपदक निश्चित होणार होते. त्याने अतिशय आत्मविश्वास व अचूक तंत्र दाखवीत हे वजन उचलले आणि सुवर्णपदक निश्चित केले. दुसऱ्या प्रयत्नात त्याला १५० किलो वजन उचलता आले नाही मग त्याने तिसरा प्रयत्न घेतलाही नाही.
आज मला मिळालेले सुवर्णपदक हे मी माझ्या वडिलांनाच अर्पण करीत आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाल्यानंतर माझी आई शेतमजुरी करून आमचे घर चालवीत आहे. माझ्या दोन्ही मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून त्यांचेही मला नेहमी सहकार्य मिळत आहे असे सांगून महादेव म्हणाला माझ्या यशामध्ये क्रीडा प्रबोधिनी मधील सर्व प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये अनुष लोखंडे, निखिल कोळी यांची रुपेरी कामगिरी
महाराष्ट्राच्या अनुष लोखंडे याने मुलांच्या ६१ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. स्नॅच मध्ये १०६ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १३१ किलो असे एकूण २३७ किलो वजन उचलले. ओडिशाच्या सदानंद बरीहा याने २४२ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. तो कल्याणचा रहिवासी असून सध्या तो संभाजीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात विजय रोहिला व तृप्ती पराशर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याला योगेश शर्मा यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या युवा राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाचा वेध घेतला होता. खेलो इंडियातील त्याचे हे पहिलेच पदक आहे.
निखिल कोळी याने वेटलिफ्टिंग मधील मुलांच्या ५५ किलो गटात रौप्य पदक जिंकून कौतुकास्पद यश संपादन केले. सांगली जवळील उमदी या खेडेगावात जन्म झालेल्या या खेळाडूने या स्पर्धेतील आपले हे पहिलेच पदक नोंदविले. निखिल याने ५५ किलो गटातील स्नॅच या प्रकारात ९३ किलो तर क्लीन व जर्क या प्रकारात ११९ किलो असे एकूण २१२ किलो वजन उचलले. तो त्याच्या खेडेगावातच संजय नांदणीकर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. त्याचे वडील शेती करतात. त्यांनाही खेळाची आवड होती व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे असे त्यांचे स्वप्न होते, परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना हे स्वप्न साकारता आले नाही. त्यांनी आपले क्रीडा क्षेत्रातील यश मिळवण्याचे अपुरे राहिलेले स्वप्न आपल्या मुलाने करावे यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करीत त्याला सतत प्रोत्साहन दिले आहे.
निखिल हा इयत्ता सातवी पासून वेटलिफ्टिंग करीत आहे. तो सध्या एम. व्ही. महाविद्यालयात बारावीत शिकत आहे. त्याला खेळामध्ये करिअर करायचे आहे. राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये अनेक वेळा अव्वल संपादन केले आहे. वेटलिफ्टिंग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्याचे त्याचे ध्येय असून त्यासाठी अपार मेहनत करण्याची त्याची तयारी आहे.
—-
नेमबाजीत पुण्याच्या स्वराजला कांस्यपदक
खेलो इंडिया स्पर्धेत पुण्याच्या स्वराज भोंडवेने नेमबाजीत २५ मीटर पिस्तूल प्रकारांत महाराष्ट्रासाठी कांस्य पदकाची कमाई केली. चेन्नई येथील गुरुनानक महाविद्यालयाच्या शुटींग रेंजमध्ये झालेल्या स्पर्धेत केवळ २ शॉट गमविल्याने रौप्य पदक हुकले. त्रिपुराच्या तनिष्क नायडूने सुवर्ण तर आंध्र प्रदेशच्या मुकेश नेलावल्ली याने रौप्य पदक जिंकले.
यापूर्वी झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत स्वराजने कांस्य पदकाची कमाई केली होती. मात्र यावेळी सुवर्ण पदकाचे स्वराजचे स्वप्न पूर्ण होवू शकले नाही. पुण्यातील बालेवाडीमधील गगन नारंग अॅकादमीमध्ये सराव करणारा स्वराज म्हणाला, गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली आहे. मात्र, मी आता केवळ १६ वर्षांच्या असल्याने सुवर्ण पदक मिळविण्यासाठी मला अजून दोन संधी आहेत. पुढील वर्षी अजून जास्त सराव करून नक्कीच सुवर्णपदक जिंकणार आहे.
—–
खोखो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा दोन्ही गटात लागोपाठ दुसरा विजय
मदुराई येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेतील खो-खोच्या मुलांच्या गटात महाराष्ट्राने तामिळनाडूचा २५-२० एक डाव व पाच गुणांनी पराभव केला व साखळी गटात लागोपाठ दुसरा विजय नोंदवित उपांत्य फेरीसाठी वाटचाल कायम राखली. त्यावेळी महाराष्ट्राकडून भारतसिंग (एक मिनिट ५० सेकंद), रमेश वसावे (एक मिनिट ४० सेकंद), विराज गळतगे व विकास देशमाने (प्रत्येकी दोन मिनिटे) यांनी संरक्षणात उत्तम कामगिरी केली. त्यांना वैभव मोरे ( ४ गडी व दीड मिनिटे) व सार्थक बालबुद्धे (३ गडी) यांची सुरेख साथ लाभली.
मुलींच्या गटातही महाराष्ट्राने लागोपाठ दुसरा विजय नोंदविताना तामिळनाडूचा ३२-२१ असा एक डाव ११ गुणांनी दणदणीत पराभव केला. त्याचे श्रेय सानिका चाफे (एक मिनिट ४० सेकंद), निशा वैजलं (एक मिनिट ५० सेकंद) दीपाली राठोड (दोन मिनिटे), कल्याणी कंक (३ गडी व दीड मिनिटे) यांना द्यावे लागेल. त्यांना संपदा मोरे व सुहानी धोत्रे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करीत चांगली साथ दिली.
साखळी गटातील पहिल्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघांनी मुले व मुली या दोन्ही गटात विजय मिळवत शानदार प्रारंभ केला होता. गतविजेत्या महाराष्ट्राने मुलींच्या गटात कर्नाटक संघाचा ३०-१३ असा दणदणीत पराभव केला. मुलांच्या गटात महाराष्ट्राने पश्चिम बंगाल संघाचा ३९-३५ असा पराभव केला होता.
—
टेनिसमध्ये तनिष्क, अस्मी, रुमा, ऐश्वर्या यांची आगेकूच..!!
मुलांच्या एकेरीत महाराष्ट्राच्या तनिष्क जाधवने तेलंगणाच्या अदुर्य पर्जन्य याला ६-२, ६-३ असे पराभूत करताना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. मुलीच्या विभागामध्ये अस्मी आडकरने पद्दूचेरीच्या आर. कियाशिनीला ६-१, ६-० असे पराभूत करताना आगेकूच केली. मुलींच्या विभागामध्ये रुमा गायकायवरीने हरयाणाच्या तमन्ना टाकोरीयाला ६-२, ६-३ असे तर ऐश्वर्या जाधवने उत्तर प्रदेशच्या शगुन कुमारीला ६-३, ६-२ असे पराभूत करताना स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. महाराष्ट्राच्या नीव कोठारीला ओडिसाच्या देबाशिशकडून १-६, १-६ असा, तर स्वराज ढमढेरेला कर्नाटकच्या जेसन डी कडून ६-२, ६-३ असा पराभव स्वीकारावा लागला.
