नृत्यनाट्य सादरीकरणाने रंगला पॅनोरमा नृत्य महोत्सव

पॅनोरमाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात गुरु स्मिता महाजन आणि त्यांच्या शिष्यांनी भरतनाट्यम नृत्यशैलीच्या परंपरागत रचनेनुसार मार्गम, जतिस्वरम, शब्दम, वर्णम,पदम आणि तिल्लाना अशा क्रमाने सादरीकरण करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. स्वतः स्मिता महाजन यांनी आई आणि मुलगी, या नात्यातील कालातीत वात्सल्यभावाचे अनोखे भावदर्शन पदम् च्या माध्यमातून रसिकांना घडवले. ‘रागावू कशी तुला लाडके’, असे शब्द असणारे हे पद स्मिता महाजन यांनी स्वतः रचलेले, संगीतबद्ध, नृत्यसंरचनाबद्ध आणि अर्थातच अभिनित केले होते. या सादरीकरणातील स्मिताताईंचा अभिनय, त्यातील सूक्ष्मता, आई आणि मुलगी यांच्यातील क्षणाक्षणाला बदलणाऱ्या भूमिका, त्यानुरूप देहबोली हे सारेच अनुभवण्याचे विषय होते. या सर्व सादरीकरणासाठी सौम्या आर्या (गायन), यशवंत हंपीहोली (मृदंगम), बी अनंतरामन (व्हायोलीन), कीर्ती ठेंबे (नटुअंगम) यांनी पूरक साथ केली.
महोत्सवाच्या चौथ्या सत्राची सुरुवात ‘देवी’ या नृत्यनाटिकेने झाली. सती, पार्वती, अर्धनारी, जगन्माता आणि महिषासुरमर्दिनी या पाच रूपांचे दर्शन यात घडले. त्यानंतर ‘नृत्य गीताई’ या पल्लवी नाईक यांच्या नृत्यानाटीकेत कृष्णाची भूमिका गुरू स्मिताताई यांनी निभावली. विश्वरूप दर्शनाचे गूढ अर्जुनापुढे उलगडणारा कृष्ण आणि त्याच्या असाधारणतेने अचंबित अर्जुन हे दृश्य पाहून सभागृह भारावून गेले होते.
अलका लाजमी यांनी स्वागत केले तर कार्यक्रमाचे निवेदन गौरी स्वकुळ यांनी केले.
