पीएमपीएमएलचा उद्या ‘प्रवासी दिन’
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या संचलन कार्यक्षेत्रातील विविध मार्गांवर, स्थानकांवर प्रवाशी वर्गास चांगली, तत्पर व विश्वसनीय बससेवा देण्याच्या दृष्टीने व बससेवेबाबत प्रवाशांना येणाऱ्या अडचणी/तक्रारींची तातडीने दखल घेवून त्या अडचणी व तक्रारींचे निराकरण करणे आवश्यक असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या संकल्पनेतून दर्जेदार व प्रवाशीभिमुख बससेवेसाठी प्रवाशांच्या सूचना
परिवहन महामंडळास प्राप्त व्हाव्यात याकरीता सर्व डेपोंमध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी ‘प्रवासी दिन’ साजरा करण्यात येत आहे.
माहे जानेवारी २०२४ मधील ‘प्रवासी दिन’ हा उपक्रम शुक्रवार, दि. १२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ०३.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत प्रत्येक डेपोत साजरा करण्यात येणार आहे. ‘प्रवासी दिना’निमित्त प्रत्येक डेपोसाठी नेमणूक केलेले पालक अधिकारी यावेळी प्रत्येक डेपो मध्ये उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्या प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन कामामुळे, वेळेअभावी डेपोमध्ये येऊन तक्रार किंवा सूचना करण्यास येता येत नसेल त्या प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या मुख्य बसस्थानकांवर व पास केंद्रांवर अर्ज द्यावेत. तरी पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या ‘प्रवासी दिन’ या उपक्रमात जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
