ऐतिहासिक, लोकशाही बळकट करणारा निकाल – चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल ऐतिहासिक आहे. संसदीय लोकशाही अधिक मजबूत करणाऱ्या या निकालाचे सर्वच लोकशाहीप्रेमी नागरिकांनी स्वागत केले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
शिवसेना आमदार अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ऐतिहासिक निकाल दिला, निकालावर समाधान व्यक्त करून श्री बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, स्वतःच्या पक्षाची घटनादेखील माहीत नसणाऱ्या लोकांच्या बळावर उद्धव ठाकरेंनी कांगावा केला. विधानसभा अध्यक्षांच्या आजच्या सविस्तर निकालपत्रामुळे उद्धव ठाकरेंचा कांगावा उघडा पडला.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथ शिंदेच आहेत, हे आजच्या निकालाने जगासमोर आले. घरात बसून मुख्यमंत्री बनायचे आणि पक्षही चालवायचा हा उद्धव ठाकरे यांचा मनसुबा अंगलट आला आहे, अशी प्रतिक्रिया देखिल त्यांनी दिली.
