Saturday, June 13, 2026
BusinessLatest News

टाटा स्टारबक्स स्टोअर्सची संख्या १००० पर्यंत वाढणार, २०२८ पर्यंत भारतात दुप्पट रोजगार पुरवणार

मुंबई : स्टारबक्सने नोव्हेंबरमध्ये सादर केलेल्या ट्रिपल शॉट रिइन्व्हेन्शन स्ट्रॅटेजी या दीर्घकालीन धोरणानुसार टाटा स्टारबक्स प्रायव्हेट लिमिटेडने आज महत्त्वपूर्ण घोषणा केली. २०२८ सालापर्यंत भारतात १००० स्टोअर्स सुरू करायचे किंवा दर तीन दिवसांनी एका नव्या स्टोअरचा शुभारंभ करायचा, असे महत्त्वपूर्ण लक्ष्य गाठण्याचे स्टारबक्सने ठरवले आहे. यातील संबंधित कामांसाठी स्थानिक भागीदारांचा कौशल्य विकास, ग्राहकांना अधिक समृद्ध अनुभव देऊ करणारे स्टोअर्स सुरू करणे आणि स्टारबक्सच्या जगभरातील ग्राहकांना मूळ भारतीय चवीची कॉफी उपलब्ध करून देणे यावर या धोरणातून भर देण्यात येणार आहे.

ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या टप्प्यावर पोहोचलेली भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने प्रगती करत आहे. २०३० पर्यंत ही अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळेच स्टारबक्ससाठी ही महत्त्वाची बाजारपेठ ठरली आहे. भारतीय बाजारपेठ ही स्टारबक्सची जगभरातील सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ असल्याने तिचे धोरणात्मक महत्त्वही वाढले आहे. त्यामुळेच, या बाजारपेठेत स्टारबक्सने आपला व्यवसाय दुपटीने वाढवण्याचे ठरवले आहे.

स्टारबक्स कॉफी कंपनी आणि टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड मध्ये २०१२ साली ५०:५० भागीदारीत संयुक्त करार झाला. त्याआधारे टाटा स्टारबक्स सध्या ५४ भारतीय शहरांमध्ये ३९० हून अधिक स्टोअर्स चालवत आहे. या स्टोअर्समध्ये अभिमानाने हिरव्या रंगाचे अॅप्रन घालून ग्राहकांना सेवा देणारे सुमारे ४३०० भागीदार (कर्मचारी) स्टारबक्ससोबत आहेत.

२०२८ पर्यंत १००० स्टोअर्सचे आपले लक्ष्य गाठण्यासाठी कंपनीतील मनुष्यबळ दुपटीने वाढवून ही संख्या सुमारे ८६०० भागीदारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. भारतातील द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये व्यवसायवृद्धी, ड्राइव्ह-थ्रू वाढवणे, एअरपोर्ट्सवरील स्टोअर्स आणि २४ तास चालणारी स्टोअर्स सुरू करून ग्राहक जिथे कुठे असतील तिथे त्यांना उत्तम कंपनीतर्फे दिली जाणार आहे.

स्टारबक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण नरसिंहन यांनी मागील आठवड्यात भारताला भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले, “मागील ११ वर्षांमध्ये भारतीय बाजारपेठ स्टारबक्ससाठी जगभरातील सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ ठरली आहे. भारतात मध्यम वर्गाचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या कॉफी संस्कृतीचा लाभ घेत या पेयाचा समृद्ध वारसा जपत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. टाटा या आमच्या विश्वासार्ह व्यावसायिक भागीदार आणि आमचे सर्व ग्रीन अॅप्रन भागीदार यांच्यासोबत असंख्य संधींचा वेध घेण्यास आम्ही सज्ज आहोत. भारतात दर तिसऱ्या दिवशी एका स्टोअरचा शुभारंभ करणे आणि त्यातून व्यवसायवृद्धी करत आम्ही खऱ्या अर्थाने जागतिक होण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षा जोपासत आहोत.”

भारतात बीन-टू-कप म्हणजेच बीपासून कपापर्यंतचा कॉफीचा अनुभव वृद्धिंगत करताना
स्टारबक्स रिझर्व्ह फोर्ट मुंबई ची सुरुवात २०२२ मध्ये झाली. या स्टोअरला मिळालेले यश पाहता टाटा स्टारबक्सतर्फे या वर्षी दुसरे स्टारबक्स रिझर्व्ह® स्टोअर सुरू करून भारतात कॉफीचा अनुभव वृद्धिंगत करण्याची दीर्घकालीन बांधिलकी पुन्हा जपली जाणार आहे. प्रीमिअम कॉफी अनुभवाची आवड असणाऱ्या चोखंदळ कॉफीप्रेमींचे प्रमाण वाढत आहे. या कॉफीप्रेमींसोबत नव्या स्टारबक्स रिझर्व्ह® स्टोअरमध्ये स्टारबक्स®च्या काळ्या अॅप्रनमधील कॉफी मास्टर्स एक अनोखा बंध निर्माण करतील, त्यांना खास क्षणांची अनुभूती देतील.

उच्च दर्जाच्या इंडियन अरेबिका कॉफीचा प्रसार करण्याचे धोरण आखत भारतभरातील सर्व स्टारबक्स रिझर्व्ह® स्टोअर्समध्ये भारतातील स्टारबक्स रिझर्व्ह® मान्सून्ड मलबार ही संपूर्ण बियांपासून बनलेली कॉफी उपलब्ध होईल. काही काळाने ही कॉफी अमेरिकेतही उपलब्ध केली जाईल.

टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील डिसुझा म्हणाले, “उच्च दर्जाच्या इंडियन अरेबिका कॉफी बियांमधील उत्कृष्ट कलात्मकतेचा प्रसार आणि भारतातील कॉफी संस्कृतीचे जतन करत टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स आणि स्टारबक्सने लक्षणीय पल्ला गाठला आहे. आता प्रगतीच्या नव्या अध्यायाकडे वळताना आम्ही भारतातील कॉफी संस्कृती यापुढेही विकसित करत राहू आणि त्यातून ग्राहकांसोबतचे आमचे बंध अधिक दृढ करू. त्याचवेळी जागतिक पटलावर आम्ही नाविन्यपूर्ण आणि खास अशी भारतीय उत्पादनेही आणणार आहोत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading