Monday, October 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

धन्य ती बंदीशाला जी स्फूर्ती देतसे आम्हाला…

येरवडा कारागृहाच्या प्रवेशद्वारात ‘जयोस्तुते जय श्री महन्मंगले’ गीताचे विद्यार्थ्यांनी केले समूह गान

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुक्ततेची शताब्दी साजरी : इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने आयोजन

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानची काळ्यापाण्याची शिक्षा भोगून काही काळ रत्नागिरी व नंतर पुण्याच्या येरवडा कारागृहात बंदी होते. जनतेच्या दबावामुळे सरकारने त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला तब्बल १४ वर्षांची कष्टप्रद शिक्षा भोगून ६ जानेवारी १९२४ साली येरवडा तुरुंगातून ते मुक्त झाले. या ऐतिहासिक मुक्ततेची शताब्दी विद्यार्थ्यांनी येरवडा कारागृहासमोर ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ या गीताचे समूहगान करीत साजरी केली आणि भारत माता की जय चा जयघोष करीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना दिली.

इतिहास प्रेमी मंडळ आणि सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्पाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुक्ततेची शताब्दी साजरी करण्यात आली. यावेळी माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित , समता बालक मंदिराचे विश्वस्त शिवाजी ठोंबरे , उद्योजक गणेश बाबर, जनहित प्रतिष्ठानचे सुरेश घाटे, मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, मुख्याध्यापिका अनिता भोजने उपस्थित होते. समता बालक मंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यावेळी समूहगान केले.

मोहन शेटे म्हणाले, सावरकरांची सुटका होणार हे कळल्यावर त्यांचे मावसबंधू‌ डॉ.वि.म.भट त्यांना आणायला गेले.तुरुंगाचे एक लेखनिक म्हात्रे यांनी दिलेले धोतर , कोट , टोपी घालून सावरकर भटांच्या घरी आले. त्यांच्या सुटकेची बातमी कळताच न.चिं केळकर , शि.म.परांजपे व शे दीडशे लोक भेटायला आले. आपण रामाप्रमाणे चौदा वर्षे वनवास भोगलात असे लोक म्हणाले. पण सावरकर म्हणाले की रामाने रावणाचा वध करून आपले ध्येय साध्य केले होते पण भारताच्या स्वातंत्र्याचे माझे ध्येय अजून साकार झाले नाही.आता पुन्हा एकदा ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, ‘ असा नारा सावरकर यांनी दिला.

आपली सुटका होणार हे आदल्या दिवशीच सावरकरांना कळले होते.त्या रात्री पाऊस पडल्याने कोठडीत पाणी झाले होते.ती रात्र त्यांना कुडकुडत काढावी लागली तरी प्रदीर्घ व कष्टप्रद शिक्षेतून होणा-या मूक्ततेचा आनंद अवर्णनीय होता. अशी माहिती ही मोहन शेटे यांनी दिली.

आभार प्रदर्शन सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्पाचे प्रमुख विजय शिवले यांनी केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading