fbpx
Wednesday, May 15, 2024
Latest NewsPUNE

हस्तप्रत्यारोपणाची तब्बल सहा तास चाललेली अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे : सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी दिपावलीच्या शुभ दिवशी अतिशय दुर्मिळ व गुंतागुंतीची हस्तप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीतीने करून वैद्यकीय विश्वात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. पुण्यातील हडपसर येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये प्लॅस्टिक व कॉस्मेटिक शल्यचिकित्सक व सल्लागार डॉ. सुमित सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कुशल वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमने हे विलक्षण यश मिळविले आहे.

रुग्ण रमेश (नाव बदलले आहे) यांचा पहाटे दिवे घाटातून दुचाकीवरुन प्रवास करीत असताना ट्रकने धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. त्यांचा उजव्या बाजूचा हाताचा वरचा भाग कापला गेला. त्यांना हडपसर येथील सह्याद्रि रुग्णालयात तातडीने आणले गेले आणि डॉ. सुमित सक्सेना यांनी त्वरित त्यांच्यावर योग्य उपचार करणे चालू केले.

तब्बल सहा तासांच्या अवघड शस्त्रक्रियेमध्ये डॉ. सुमित सक्सेना आणि त्यांच्या टीमने तो तुटलेला अवयव जोडण्याचे आव्हानात्मक कार्य केले. या गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रियेबाबत बोलताना डॉ. सुमित सक्सेना म्हणाले, “अशा क्लिष्ट शस्त्रक्रियांमध्ये ‘वेळ’ ही महत्त्वाची बाब असते. शरीरातील  रक्तवाहिन्या, नसा, स्नायू, स्नायूबंध आणि हाडे यांच्यासह सर्व महत्त्वाच्या संरचना सहा तासांच्या आत ठीक केल्या. त्यातही मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाल्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होती.”

डॉ. सक्सेना यांनी या शस्त्रक्रियेतील तांत्रिक अडचणी आणि क्लिष्टता स्पष्ट करत सांगितले की, “ही शस्त्रक्रिया अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीची होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात विच्छेदन करावे लागणार असल्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होता. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अत्यंत सावध व बारीकसारीक तपशिलांबाबत जागरूक दृष्टीकोन आवश्यक असल्याने ही शस्त्रक्रिया विशेषतः अधिक कठीण होती. जेव्हा उच्च प्रमाणात विच्छेदन करावे लागते तेव्हा लौकर शरीर बरे होणे हे अवघड होते, शिवाय या रुग्णास रिपरफ्यूजन जखमेची (रिपरफ्यूजन इन्ज्युरी-आर आय हे एका अत्यंत गंभीर शारीरिक परिस्थितीचे वैद्यकीय नाव आहे) शक्यता असल्याने रुग्णाच्या जीवास धोका होता. शस्त्रक्रियेनंतर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक होते.”

डॉ. सक्सेना पुढे म्हणाले, “अशा प्रकारची शस्त्रक्रिया ही अतिशय वेगळी असून फार कमी वेळ ती केली गेली आहे आणि त्याहूनही क्वचित वेळा त्या यशस्वी झाल्या आहेत. अशा प्रत्यारोपणानंतर रुग्णास वाचविणे फार अवघड असल्याने या प्रकारच्या शस्त्रक्रिया या खरोखरीच असाधारण आहेत.”

रमेश यांना यशस्वी शस्त्रक्रियेनंतर काही आठवडे रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेऊन ते पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तरीही अतिरिक्त फ्रॅक्चर्स असल्याने अजूनही ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. विशेष म्हणजे, एवढ्या अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतरदेखील रुग्ण १५ दिवसात जलद गतीने बरा होणे हे सह्याद्रि हॉस्पिटलमधील कुशल व तज्ज्ञ डॉक्टर्स व रुग्णालय पुरवीत असलेली सर्वसमावेशक सेवा यांचे प्रमाण आहे.

दिवाळीचा सण असूनही हडपसर येथील सह्याद्रि हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमने डॉ. सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली आपल्या वैयक्तिक सणसमारंभांच्या पलीकडे जाऊन रुग्णसेवेला प्राधान्य देऊन आपल्या कर्तव्याप्रती अतूट बांधिलकी व निष्ठा दाखविली आहे.  या गुंतागुंतीच्या व क्लिष्ट शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेमुळे  रमेश यांच्या जीवावरील संभाव्य धोका तर टळलाच त्याशिवाय दिवाळीचे अंधारावर प्रकाशाचा विजय हे खरे तत्व या यशस्वी शस्त्रक्रियेने प्रत्यक्षात उतरविले.

या यशस्वी हस्तप्रत्यारोपण शस्त्रक्रियेने पुनर्रचनात्मक शल्य चिकित्सेच्या (रिकन्स्ट्रर्क्टिव्ह सर्जरी) क्षेत्रातील सीमा पार करून सह्याद्रि हॉस्पिटलचे वैद्यकीय तज्ज्ञतेचे एक प्रमुख केंद्र म्हणून स्थान अधोरेखित करते.

या शस्त्रक्रियेच्या यशामध्ये योगदान देणारी आपली समर्पित टीम; डॉ. तापडिया (अस्थी रोगतज्ज्ञ), डॉ. रूपा अब्राहम (अॅनेस्थेटिस्ट), डॉ. इनायत (अस्थी रोगतज्ज्ञ), डॉ. मनीष (सहाय्यक), रुग्णपरिचारक धर्मेंद्र आणि रुग्णपरिचारिका प्रियंका आणि अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) कर्मचारी व सर्व वॉर्ड कर्मचारी, यांचे आभार मानले. सह्याद्रि हॉस्पिटलने आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण सहाय्य केल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading