Monday, August 31, 2026
Latest NewsSports

समर्थ कराड संघ, सिंहगड लायन्स्, यंग डॉक्टर्स लीग संघ, पीसी वॉरीयर्स संघांची विजयी सलामी !!

पुणे :  यंग डॉक्टर्सं लीग (वायडीएल) यांच्या तर्फे आयोजित देशातील पहिल्या ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ राष्ट्रीय स्पर्धेच्या क्रिकेटमध्ये समर्थ कराड संघ, सिंहगड लायन्स्, यंग डॉक्टर्स लीग संघ अ आणि ब संघ आणि पीसी वॉरीयर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना क्लब, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी-सिंहगड रोड, स्केलअप अ‍ॅकॅडमी मैदान-वारजे, डीएसके स्टार क्रिकेट अ‍ॅकॅडमी-धायरी आणि शिंदे हायस्कूल-सहकारनगर अशा विविध मैदानांवर आजपासून क्रिकेट स्पर्धेचे सामने सुरू झाले. रवि खेतमर याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर समर्थ कराड संघाने इलेव्हन स्ट्रायकर्स मिरज संघचा १९ धावांनी पराभव करून शानदार सुरूवात केली. अमित शिंदे याच्या फलंदाजीच्या जोरावर पुण्याच्या सिंहगड लायन्स् संघाने विद्यारत्न वॉरीयर्स संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला.

महेश शिंदे याच्या कामगिरीच्या जोरावर यंग डॉक्टर्स लीग संघ ब संघाने जहांगीर टायटन्स्चा १० गडी राखून सहज पराभव केला. निलेश पाटील याच्या नाबाद ३९ धावांच्या जोरावर यंग डॉक्टर्स लीग संघ अ संघाने कोल्हापूर इलेव्हनचा ४ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. विवेक पाटील याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पीसी वॉरीयर्स संघाने ससून इलेव्हनचा ४ गडी राखून पराभव करत विजयी कामगिरी केली.

या स्पर्धेचे उद्धघाटन आज (शुक्रवारी) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून आमदार आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम, बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक खेळाडू निखील कानेटकर, राष्ट्रीय टेनिसपटून संदीप किर्तने आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे डॉ. भुषण माणगांवकर आणि पराग देशमुख आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा उद्धघाटन सोहळा आज (शुक्रवार, १ डिसेंबर रोजी) श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल-बालेवाडी येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
समर्थ कराड संघः ८ षटकात ४ गडी बाद ८६ धावा (उमेश साळूंखे ३७, अजय सकपाळ १६, राहूल पाटील नाबाद १५, सचिन जंगम २-९) वि.वि. इलेव्हन स्ट्रायकर्स मिरज संघः ८ षटकात ५ गडी बाद ६७ धावा (प्रसाद वाव्हरे नाबाद ३१, अभय भोसले १५, रवि खेतमर ३-१२); सामनावीरः रवि खेतमर;

विद्यारत्न वॉरीयर्सः ८ षटकात २ गडी बाद ५८ धावा (लिखीत मेनन नाबाद ४५, साजीथ सोमन नाबाद ११, संतोष भोसले १-११) पराभूत वि. सिंहगड लायन्स्ः ४.३ षटकात १ गडी बाद ५९ धावा (अमर रायक्रांतीवर नाबाद २५, अमित शिंदे नाबाद २५); सामनावीरः अमित शिंदे;

जहांगीर टायटन्स्ः ८ षटकात ३ गडी बाद ५६ धावा (युवराज शहा नाबाद २४, तपन मेहता ११, गौरव कर्वे २-१२) पराभूत वि. यंग डॉक्टर्स लीग संघ बः ४.१ षटकात बिनबाद ५७ धावा (महेश शिंदे नाबाद ३७, राहूल कशिदे नाबाद १७); सामनावीरः महेश शिंदे;

कोल्हापूर इलेव्हनः ८ षटकात ८ गडी बाद ६२ धावा (योगेश पाटील १५, विनय आपटे नाबाद १४, प्रदीप पोतदार १४, प्रतिक अजागेकर ३-८, निलेश पाटील २-१७) पराभूत वि. यंग डॉक्टर्स लीग संघ अः ६ षटकात बिनबाद ६४ धावा (निलेश पाटील नाबाद ३९, आनंद कराळे नाबाद २३); सामनावीरः निलेश पाटील;

ससून इलेव्हनः ८ षटकात ७ गडी बाद ५४ धावा (अजय पवार १८, अंकित सोनावणे १४, विवेक पाटील ३-१०, अगस्ती गवासणे २-११) पराभूत वि. पीसी वॉरीयर्सः ७.४ षटकात ६ गडी बाद ५५ धावा (रत्नदीप जाधव १२, आनंद पिसे ११, वरद फाटक १०, अंकित सोनावणे २-७, विजय जाधव २-१३); सामनावीरः विवेक पाटील;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading