Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

योध्या राम मंदिरातील अक्षतांची मंगल कलश यात्रा पुण्यात

पुणे :  प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा असलेला रथ…ढोल ताशांचा गजर…शंखांचे वादन…जय श्री रामचा जयघोष अशा आनंद आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांचे पूजन करीत ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरापासून भव्य मंगल कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी महिला डोक्यावर अक्षता कलश घेऊन यात्रेत सहभागी झाल्या होत्या. यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या २४ कलशातील अक्षता पश्चिम महाराष्ट्रातील सर्व गावातील प्रत्येक घरात देण्यापूर्वी पुण्यात कलश यात्रा काढण्यात आली. त्यानंतर स्वारगेट जवळील दादावाडी जैन मंदिरामध्ये या अक्षतांचे कलश ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. यशोधन साखरे यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्रातील २४ भागातील विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिनिधींकडे कलश सोपविण्यात आले.

कसबा गणपती मंदिरात या सर्व कलशांचे विविध जाती व संप्रदायांमधील २४ दांपत्यांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चाराने पूजन करण्यात आले. कसबा देवस्थानचे प्रमुख ठकार यांनी पूजेला बसलेल्या सर्वांना संकल्प दिला. सज्जनगडावरील समर्थ सेवा केंद्राचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी, रा. स्व. संघ प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत संघचालक नाना जाधव, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री संजय मुद्राळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यावेळी उपस्थित होते. संपूर्ण यात्रेचे नियोजन विश्व हिंदू परिषदेचे प्रांताचे विशेष संपर्कप्रमुख किशोर चव्हाण यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर व कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे कलशांचे पूजन व यात्रेचे स्वागत करण्यात आले.

योगेश बुवा रामदासी म्हणाले, समर्थ रामदासांनी ज्याप्रमाणे प्रभू रामरायाची भक्ती करून रामरायाचा आदर्श ठेवून लोकांना धर्माभिमानी आणि देशाभिमानी बनविण्याचा प्रयत्न केला आणि बलोपासनेचे महत्त्व प्रतिपादन करून श्री रामचंद्र यांच्या चारित्र्याचा आदर्श लोकांसमोर उभा केला, त्याप्रमाणे या अयोध्येतील मंदिरापासूनही प्रेरणा घेऊन धर्माभिमानी आणि राष्ट्रभिमानी नागरिक निर्माण होतील.

संजय मुद्राळे म्हणाले,  भगवान श्रीराम हे सगळ्यांचे आदर्श आहेत ते राष्ट्रनिर्माते आणि राष्ट्र जागरणाचे अखंड प्रेरणा स्रोत  आहेत जोपर्यंत प्रभू श्रीरामाचा आदर्श आपण समोर ठेवतो आहोत तोपर्यंत आपल्या देशाला आपल्या धर्माला आणि आपल्या संस्कृतीला कोणीही धक्का लावू शकणार नाही. त्यामुळे अयोध्येत निर्माण होणारे मंदिर हे केवळ राम मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे, असेही त्यांनी सांगितले. श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट, केशव शंखनाथ पथक यांनी यावेळी वादन केले. अभिजीत बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading