Saturday, October 17, 2026
Latest NewsPUNE

श्री महालक्ष्मी मंदिरात प्रभू श्रीरामांची चित्ररंगावली व दीपोत्सव

पुणे : प्रभू श्रीरामांची चित्ररंगावली….विविधरंगी पणत्यांसह दिव्यांची आकर्षक आरास… नानाविध फुलांची सजावट व विद्युतरोषणाईने उजळलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराचे विलोभनीय दृश्य त्रिपुरारी पौर्णिमेला पहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगलमय, धार्मिक वातावरणात जय श्रीराम… श्री महालक्ष्मी माता की जय… च्या नामघोषात तब्बल ११ हजार पणत्यांचा दीपोत्सव मंदिरामध्ये करण्यात आला.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.

विश्वकर्मा युनिव्हर्सिटी व विश्वकर्मा विद्यालय यांनी दीपोत्सवातील पणत्यांची आरास केली. महिलांनी विविधरंगी वेशभूषेत दीपोत्सवात सहभाग घेतला. सुगंधी फुलांद्वारे आणि दिव्यांच्या प्रकाशातून अयोध्येतील श्रीराम मंदिर उजळून निघू देत, अशी शुभेच्छा व प्रार्थना यानिमित्ताने देवीचरणी करण्यात आली.

ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेला आम्ही दरवर्षीप्रमाणे उत्साहाने दीपोत्सव साजरा करीत आहोत. दिव्यांच्या प्रकाशाने ज्याप्रमाणे अंधकार दूर होतो, त्याप्रमाणेच समाजातील वंचित व गरजू घटकाच्या आयुष्यातील अंधकार दूर व्हावा, अशी प्रार्थना देखील करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading