अडाणी आदीवासी उच्चशिक्षित होतात, तेव्हा अभिमान व सार्थकता वाटते – अनिकेत प्रकाश आमटे
पुणे : पराकोटीच्या दुर्गम आदीवासी भागांतील विद्यार्थी हेमलकसा मधील शाळांमध्ये शिकून उच्चशिक्षित होतात, तेव्हा वाटणारे समाधान अवर्णनीय असते. पण असंख्य प्रकारच्या सुविधा- योजना असूनही, आमच्यासारख्या समाजसेवकांना समांतर व्यवस्था सुरू ठेवाव्या लागतात, याची खंतही वाटते, अशी संमिश्र भावना हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत प्रकाश आमटे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. पी. एम. शहा फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ‘सामान्य ते असामान्य’ या उपक्रमांतर्गत आमटे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. अनिकेत आमटे यांच्याशी मोनिका जोशी आणि अॅडव्होकेट चेतन गांधी यांनी संवाद साधला. सेनापती बापट रस्त्यावरील वर्धमान प्रतिष्ठान येथे हा संवादाचा कार्यक्रम संपन्न झाला.
फाऊंडेशनचे संचालक अॅड. चेतन गांधी व वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड यांच्या हस्ते आमटे यांचा मानपत्र देवून गौरव करण्यात आला. या संवादातून लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेला दवाखाना, सामुदायिक आरोग्य कार्यक्रम, शाळा, साधना विद्यालय, जिंजगाव येथील लोकबिरादरी शिक्षा संकुल, प्राणी अनाथालय, ग्रामविकास योजना अशा कित्येक पैलूंविषयीची माहिती उपस्थित श्रोत्यांसमोर उलगडली.
अनिकेत आमटे म्हणाले, “आमच्या पिढीची सामाजिक कार्याची पायाभरणी आजोबा बाबा आमटे आणि आईवडील डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांच्यामुळे झाली. आजोबांनी आनंदवनाचे कार्य केले आणि डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी यांनी हेमलकसा येथे कार्य करून ती परंपरा सुरू ठेवली. माझी तिसरी पिढीही आता याच कार्याचा वसा सांभाळते आहे. मी सातवीपर्यंत हेमलकसा येथे शिकलो. नंतर उच्चशिक्षणासाठी पुण्यात आलो. अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर होऊनही माझे मन हेमलकसामध्ये रमले. इथल्या माडिया आदीवासींच्या सर्वतोपरी साह्यासाठी काम सुरू आहे. बाबांची पिढी आणि माझी पिढी असा प्रवास पाहिला, तर खूप सकारात्मक बदल घडले आहेत. घनदाट जंगल, श्वापदे, रोगराई, शोषण, अन्याय झेलणाऱ्या आदिवासींमध्ये आरोग्य सेवा, शिक्षण, मूलभूत गरजांच्या प्राप्तीमुळे आमूलाग्र बदल पडलेले दिसतात, हे पाहण्यात सार्थक वाटते.”
आमच्या कुटुंबाला महान सामाजिक कार्याची परंपरा असल्याने समाजाच्या आमच्याकडून अपेक्षा मोठ्या असतात. त्या गैर नाहीत. पण तिसरी पिढी कार्य करताना, मध्ये मोठा कालखंड निघून गेला आहे. पिढ्या बदलल्या आहेत. काळ आणि समाजही बदलला आहे, याचे विस्मरण होते की काय, असे वाटते. आजोबांच्या काळातील समस्या, कार्याची गरज निराळी होती. बाबांच्या काळात त्यात बदल झाले. आमच्या पिढीत हे बदल अधिक वेगाने होत आहेत. अपेक्षा करणाऱ्यांनी हा क्रमही लक्षात ठेवावा. आम्ही मूळ तत्त्वांशी तडजोड केली नाही, फक्त ती राबविण्याच्या प्रक्रियेत काही बदल केले, इतकेच, असे आमटे यांनी नमूद केले.
आदीवासींमध्ये अफाट क्षमता आहेत, फक्त त्यांना संधी मिळत नाहीत. शिक्षणाने आता बदल घडत आहेत. आदिवासी विद्यार्थी उत्तम शिकत आहेत. इथले विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक क्षेत्रात तसेच क्रीडा क्षेत्रात चमकत आहेत. राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा गाजवत आहेत, हे सारे आमच्या अभिमानाचे क्षण आहेत. अर्थात त्यासाठी आजोबा, बाबा-आई, काका आणि साऱ्याच कुटुंबातील सदस्यांचे मोठे योगदान आहे. आदीवासींमध्ये आता जाणीव, जागृती दिसते. शिक्षणाचा आग्रह दिसतो. जीवनशैलीशी त्यांचा परिचय झाला आहे. तरीही शिकणाऱ्यांची संख्या आणि उपलब्ध सुविधांचा मेळ बसत नाही. सरकारी पातळीवरच्या अनेक योजना- सुविधा पोचत नाहीत आणि मग आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रातील मंडळींना आजही समांतर व्यवस्था उभ्या कराव्या लागतात, याची काहीशी खंत वाटते, असेही आमटे म्हणाले.
