fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

२५ व २६ नोव्हेंबर रोजी मित्र महोत्सवाचे आयोजन

पुणे : पुण्यातील मित्र फाउंडेशन यांच्या वतीने येत्या शनिवार दि. २५ नोव्हेंबर आणि रविवार दि. २६ नोव्हेंबर, २०२३ रोजी मित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिवशी सायंकाळी ५.३० वाजता कर्वेनगर येथील पंडित फार्म्स या ठिकाणी महोत्सव संपन्न होईल. महोत्सवाचे दोन्ही दिवसांसाठीचे मिळून प्रवेश शुल्क नाममात्र रु १००/- फक्त इतके आहे.

महोत्सवाची सुरुवात शनिवार, दि २५ नोव्हेंबर रोजी सुप्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार यांच्या सतार वादनाने होईल, यावेळी सत्यजित तळवलकर हे तबलासाथ करतील. यानंतर विदुषी अश्विनी भिडे – देशपांडे यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना भरत कामत तबल्यावर तर सुयोग कुंडलकर हे संवादिनीवर साथसंगत करतील. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (रविवार, दि. २६ नोव्हेंबर) पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य शंतनू गोखले यांचे संतूरवादन होईल त्यांना सत्यजित तळवलकर हे तबलासाथ करतील. महोत्सवाची सांगता प्रसिद्ध गायक पंडित व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने होईल. यावेळी भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (संवादिनी) हे साथसंगत करतील.

मित्र फाउंडेशन तर्फे दरवर्षी गुरुजनांचा आणि गुणिजनांचा सत्कार करण्यात येतो. मित्र महोत्सवात दि. २६ नोव्हेंबर रोजी रविवारी ज्येष्ठ तबलावादक गुरु पं. सुरेश सामंत यांचा सत्कार करण्यात येईल. याबरोबरच जे विद्यार्थी संपूर्ण वेळ शास्त्रीय संगीत, गायन आणि वादनाचे शिक्षण घेत आहेत अशा १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय गोखले यांनी दिली.

Leave a Reply

%d