fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

अष्ट सहस्त्र पणत्यांच्या लखलखाटात ‘दीपोत्सव तपपूर्ती’

पुणे : दिवाळी पाडव्याची मंगलमय संध्याकाळ… तुतारीची ललकारी… सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर… आणि स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, पुणेकरांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा वातावरणात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वातील पहिल्या भव्यदिव्य अश्वारूढ स्मारकापाशी शिवजयंती महोत्सव समिती तर्फे सलग १२ व्या वर्षा श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव सोहळा साजरा झाला. जय भवानी… जय शिवाजी.. हर हर महादेवचा मर्दानी जयघोष आणि तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या अष्ट सहस्त्र पणत्यांच्या लखलखाटात सर्व वातावरण शिवमय झाले.

श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस संस्था प्रांगण येथे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, इतिहास संशोधक भाई चिंचवडे, समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरविंद माने, स्वराज्य घराण्यांच्या वंशजांच्या, समितीच्या महिला भगिनींच्या व व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.

शिवजयंती १९ फेब्रुवारीला स्वराज्यघराण्यांची वज्रमूठ निर्माण करणाऱ्या ऐतिहासिक सार्वजनिक शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागाची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सरनोबत पिलाजी गोळे, सरसेनापती प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला, शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे ह्या स्वराज्यघराण्यांचा अखंड भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन तसेच शुरवीर शेलारमामा, सरलष्कर खंडोजी दरेकर, शिव स्वराज्याचे शिलेदार कुंजीर, सरदार हिरोजी शेळके, स्वराज्यवीर फडतरे या स्वराज्यघराण्यांचा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात पदार्पण केल्याबद्दल दीपोत्सवाचे सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.

भाई चिंचवडे म्हणाले, तपपूर्तीचे अनन्यसाधारण महत्व ओळखून गायकवाड यांनी सुरु केलेल्या विश्वातील सर्वात मोठ्या शिवस्वराज्य कार्यात प्रत्येकाने जबाबदारीने भान ओळखून तनमनधन झोकून निष्ठेने काम करणे गरजेचे आहे.

अमित गायकवाड म्हणाले, ध्येय ठेवून संयमाने वाटचाल केल्याने तपपूर्तीचे मधूर फळ मिळाले आहे. हे यश सर्व समर्पित स्वराज्यबांधव माताभगिनींना समर्पित आहे. शिवरायांचे जगातील हे पहिले भव्य अश्वारुढ स्मारक तसेच एकसंघ ओतीव काम केलेले एकमेव स्मारक आहे. राजर्षि शाहुछत्रपती पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या स्मारकाचे अनावरण झाले होते. स्मारकाने यंदा ९५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्मारकाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पणत्यांची दिवाळी पाडव्याला शिवरायांना पारंपरिक मानवंदना देणारा हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य दीपोत्सव आहे.

दीपोत्सवाचे आयोजन सोहळ्याचे संकल्पक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, रवींद्र कंक, सचिन पायगुडे, शंकर कडू, समीर जाधवराव, निलेश जेधे, गोपी पवार, प्रवीण गायकवाड, मोहन पासलकर, किरण शितोळे, महेंद्र भोईटे, किरण देसाई, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.

Leave a Reply

%d