दस्तकारी हाट समितीतर्फे पुण्यात प्रदर्शन; दिवाळी खरेदीसाठी उत्कृष्ट संधी
पुणे : दिवाळीसाठी आगळीवेगळी खरेदी करण्याची एक उत्तम संधी पुणेकरांसाठी उपलब्ध होत आहे. दस्तकारी हाट समितीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीआधी पुण्यात प्रदर्शन भरविण्यात येत आहे. एक ते सात नोव्हेंबर या कालावधीत बंड गार्डन मार्ग येथील डच पॅलेस येथे हे प्रदर्शन भरणार आहे. तेव्हा एका आगळ्यावेगळ्या अनुभवासाठी आणि दिवाळीच्या खरेदीसाठी तुमचे हे दिवस मोकळे ठेवा. या प्रदर्शनात राजस्थानसह अनेक राज्यांमधील पारंपरिक हस्तकलांचे नानाविध कलात्मक नमूने पाहायला मिळणार आहेत. येथील नावीन्यपूर्ण उत्पादने आणि सुंदर डिझाइन्स पाहून तुम्हाला आनंद होईल. विणकाम, भरतकाम, हँड ब्लॉक प्रिंट्स, गवत, बांबू, धातू आणि लाकूड आदी साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध आकर्षक वस्तू तुमची नजर खिळवून ठेवतील. दागिने, स्टेशनरी, सिरॅमिक, टेराकोटाच्या वस्तूंसह गोंड आदिवासींच्या पारंपरिक हस्तकलेच्या वस्तूंपासून ते कालीघाट, फड, पट्टचित्र, पिछवाईस अशा अनेक पारंपरिक हस्तकलांचे नमूने येथे पाहायला मिळतील. अशा वस्तूंचे येथे सुमारे १०० स्टॉल्स असतील.
काही नावीन्यपूर्ण उत्पादनेही येथे रसिकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. ती खालीलप्रमाणे
● देसी उनतर्फे उपलब्ध करण्यात आलेले पशुपालन करणाऱ्या लोकांनी तयार केलेले वैशिष्ट्यपूर्ण कापड आणि चीज
● उदयपूरमधील आवरण ब्रँडतर्फे नैसर्गिक निळ्या (इंडिगो) रंगांतील आकर्षक सजावटीच्या वस्तू आणि कपडे
● प्रोजेक्ट 1000 चे प्लेटेड फॅब्रिकचे सुंदर टेबलवेअर
● पश्चिम बंगालमधील स्क्रोल आणि सॉंग्जच्यावतीने नवीन पट्टचित्र कलाकार लल्टू चित्रकार यांच्या चित्रकृती
● राजस्थानमधील गोल्ड लीफचे पिछवाई नक्षीच्या कलाकृती
● कच्छमधील दयाबेन यांच्या सूफ भरतकाम असलेले कपडे, सजावटीच्या वस्तू आदी
● विशाला हुंडेकरी यांनी तयार केलेली एकीबेकी नावाची कलात्मक स्टेशनरी
● जयपूरच्या एलिफंट पू ब्रँडने सेंद्रिय कच्च्या मालाच्या कागदापासून बनवलेली स्टेशनरी
● ओडिशामधील कोटपॅडच्या नैसर्गिक रंगाच्या साड्या व कापड
● ओरिसा आणि उत्तर प्रदेशातील कारागिरांनी गवतापासून तयार केलेल्या टोपल्या व अन्य वस्तू
● मणिपूरमधील वैशिष्ट्यपूर्ण काळी भांडी आणि टोपल्या
● पश्चिम बंगालमधील शोलापीठ फुले
हस्तकला कौशल्याची प्रात्यक्षिके
या प्रदर्शनात काही कारागीर आपल्या हस्तकलेचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. फिरोजाबाद येथील कारागीर काचेच्या वस्तू आणि दागिने तयार करून दाखवतील, तर
राजस्थानमधील कारागीर टेराकोटाच्या वस्तूंचे प्रात्यक्षिक दाखवतील. तसेच बिहारमधील मधुबनी पेंटिंग, ओरिसा व पश्चिम बंगालमधील पट्टचित्र, मध्य प्रदेशमधील गोंड चित्रशैली, प. बंगालमधील पिचवाई पेंटिंग आदींचे प्रात्यक्षिकही पाहायला मिळणार आहे.
खास वैशिष्ट्ये
काही निवडक कारागीर दररोज विशिष्ट वेळी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांशी संवाद साधतील. त्यांना आपल्या कामाची आणि यशस्वी कामगिरीची माहिती देतील. यामुळे ग्राहकांना कारागिरांची सांस्कृतिक पार्श्वभूमी, यशोगाथा आणि त्यांच्या कौशल्यांविषयी जाणून घेण्याची संधी मिळेल.
पुस्तक प्रकाशन
याचबरोबर, चार नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता दस्तकारी हाट समितीच्या वतीने तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यासाठी आम्ही लहान मुलांना खास आमंत्रण देत आहोत. विशेष म्हणजे या यशस्वी कथांची पायाभरणी पूर्वी पुण्यात झालेल्या दस्तकारी हाट प्रदर्शनातच झाली होती. पारंपरिक हस्तकला कारागिरांसह तीन मुलांच्या हस्ते ही पुस्तके प्रकाशित करायला आम्हाला आवडेल. नियोगी प्रकाशनातर्फे नुकतीच ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.
पुस्तकांची नावे:
- हिरा शहराला रंगवतो (हिरा पेंटस् टाऊन), लेखक : गौरी डांगे, कलाकार: हीरा कांत
- गणेशला त्याचे लाडू कसे मिळाले, (हाऊ गणेश गॉट हिज लड्डुज) लेखक: रितिका नारंग टिकू, कलाकार: अपिंद्र स्वेन
- भज्जूचा कळप आणि टिक-टॉक घड्याळ, (भज्जूज फ्लॉक अँड टिकटॉक क्लॉक ) लेखक: रितिका नारंग टिकू, कलाकार: कौशल प्रसाद टेकम
या तीनही पुस्तकांची रचना फाल्गुनी गोखले यांनी केली असून, जया जेलटी यांची संकल्पना आहे.
याशिवाय, राजस्थानमधील बाडमेर येथील आंतरराष्ट्रीय लोककलाकार भुट्टे खान मंगनियार यांचे राजस्थानी लोकसंगीत आणि कालबेलिया नृत्य सादरीकरण हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण असेल. भुट्टे खान मंगनियार यांच्या गटाने भारतासह जगातील विविध ४५ देशांमध्ये विविध ठिकाणी सादरीकरण केले आहे. कोक स्टुडिओ, सोनी, कलर्स, झी, दूरदर्शन आणि स्टार प्लस वाहिन्यांवरही त्यांनी सादरीकरण केले आहे. या कार्यक्रमामुळे या हस्तकला मेळ्याचा परिपूर्ण सांस्कृतिक अनुभव घेता येईल. येथे ग्राहकांना अस्सल राजस्थानी खाद्यसंस्कृतीचाही आस्वाद घेता येईल. राजस्थानी स्टॉलवर उत्कृष्ट शेफनी बनवलेल्या चविष्ट पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.
भारताची ग्रामीण जीवनशैली आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी मदत करण्याकरिता या सणासुदीच्या हंगामात आम्ही ग्राहक, माध्यमे आणि हस्तकलाप्रेमींना आमंत्रित करत आहोत. चला तर मग, हस्तकला कारागीर आणि ग्राहकांसाठीही हा सणाचा हंगाम आनंददायी बनवूया !
दिनांक : १ ते ७ नोव्हेंबर
वेळ: सकाळी ११ ते रात्री ९
स्थळ: डच पॅलेस, १६, बंड गार्डन रोड, रेसिडेन्सी क्लब आणि आयनॉक्स थिएटरजवळ, पुणे-४११००१
