शिक्षक महाभोंडला स्पर्धेत विश्वकर्मा विद्यालय प्रथम
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात शिक्षक महाभोंडला स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये विश्वकर्मा विद्यालयाच्या शिक्षक संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. पुण्यातील अनेक शाळांतील शिक्षकांच्या संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमाला मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष राजकुमार अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षकांनी भोंडला व विविध पारंपरिक खेळांचे सादरीकरण केले.
धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या शिक्षक संघाचा द्वितीय तर, अभिनव विद्यालयाच्या संघाचा तृतीय क्रमांक आला. शारदा विद्यालयाच्या शिक्षक संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्मृतीचिन्ह, रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक असे सन्मानाचे स्वरुप होते. यावेळी विजेत्यांच्या हस्ते देवीची आरती देखील करण्यात आली.
शिक्षकांवर विद्यार्थ्याना शिकविण्याव्यतिरिक्त असलेला कामाचा अतिरिक्त भार, स्त्री भ्रूण हत्या, डिजिटल व्यसने, देवीची नऊ रुपे, स्त्री शक्तीचे महत्व आणि महाम्य भोंडल्याच्या वेळी झालेल्या खेळांतून शिक्षकांनी उलगडले. भोंडल्याच्या पारंपरिक गाणी व खेळ मंदिराच्या सभामंडपात सादर करण्यात आले. शिक्षक पारंपरिक वेशात स्पर्धेत सहभागी झाले होते.
विश्वस्त तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, भारतीय संस्कृतीमध्ये भोंडला हा एक प्रकार अनेक वर्षांपासून नवरात्रीमध्ये केला जातो. मात्र, आज भोंडल्याविषयी माहिती लहान मुली व तरुणांनी फारशी नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी भोंडल्याविषयी अधिकाधिक माहिती गोळा करावी आणि विद्यार्थ्यांनाही याची माहिती सांगावी, याकरिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. प्रविण चोरबेले यांनी आभार मानले.
