श्री महालक्ष्मी देवीसमोर शेकडो महिलांनी केले श्रीसूक्त पठण
पुणे : हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्…चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह… अशा मंगलमय स्वरांत महिलांनी पारंपारिक वेशात श्री सूक्त पठण केले. श्री महालक्ष्मी देवीची आराधना करण्यासाठी सामुदायिक श्रीसूक्त पठणाचे आयोजन सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरासमोर करण्यात आले होते.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने सामुदायिक श्री सूक्त पठण कार्यक्रमाचे आयोजन मंदिरासमोर करण्यात आले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, अभिनेत्री गौरी देशपांडे, उर्मिला जगताप, ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.
शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेला हा आदिशक्तीचा शारदीय नवरात्रोत्सव सुरु आहे. ‘विश्वकर्मा विद्यापीठा’चे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे. सोमवारी सकाळी ६ वाजता महालक्ष्मी मंदिरासमोर प्रसन्न वातावरणात महिला श्रीसूक्त सामुदायिकरीत्या पठण करण्याकरता एकत्र आल्या. त्यानंतर ध्यानधारणेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
ॐकार, शंखनाद आणि श्रीगणेश अथर्वशीर्षाचे देखील पठण करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक श्रीसूक्त पठणाला सुरुवात झाली. शंखनाद, मंत्रोच्चार आणि श्री सूक्तपठणातून चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. तर, फलश्रुती आणि आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. नवरात्रोत्सवात घरोघरी देवीची आराधना आणि उपासना केली जाते. या आराधनेतील महत्त्वाचा भाग म्हणजे श्रीसूक्त. हे वैदिक सूक्त असून ते महालक्ष्मीची आराधना करणारे सूक्त आहे. ऋग्वेदातील खिलसूक्तात ते दिलेले आहे. लक्ष्मीचे वर्णन या सूक्तात केले आहे.
