Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व शिवांजली कार्यक्रमाचे आयोजन

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारताचे माजी राष्ट्रपती तसेच मिसाईल मॅन म्हणून प्रख्यात असलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितिन घोरपडे, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, प्रो. अरुण बनपूरकर तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जयंतीदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा होत असल्याने यानिमित्त विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष झाल्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील लिखाणावर आधारित उपलब्ध असलेले निवडक ग्रंथ या प्रदर्शनात ठेवण्यात आले असून याचे उद्धाटन डॉ.अपर्णा राजेंद्र, संचालक, जयकर ज्ञानस्रोत केंद्र यांनी केले. रविवार दिनांक १५ ऑक्टोबर ते सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सर्व ज्ञानोपासकांनी या ग्रंथप्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे डॉ.अपर्णा राजेंद्र यांनी आवाहन केले आहे.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त जयकर ज्ञानस्त्रोत आणि ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी संत नामदेव सभागृहात दुपारी ४.०० वाजता शिवांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सांगितिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांवरील कविता,उतारे, ओव्या,पोवाडे, गाणी ललित कला केंद्रातील संगीताचे विद्यार्थी सादर करणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे,अशी माहिती डॉ. राजेंद्र यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading