भारत आणि आफ्रिकन देशांनी व्यावसायिक पातळीवर एकत्र येण्याची गरज – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : आज शिक्रापूर सारख्या ग्रामीण भागात भारत आफ्रिका देशामध्ये औद्योगिक व्यापार वृद्धी होण्यासाठी आफ्रिकन देशांचे उच्चायुक्त व त्यांचे प्रतिनिधी एकत्रित आल्याने हा भारतासाठी व महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले.
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम आयोजित इंडिया आफ्रिका व्यवसाय परिषदेचे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे येथील जोशी फार्म हाऊस येथे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे आयोजन ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे अध्यक्ष श्री. जितेंद्र जोशी यांनी केले आहे. या परिषदेला उपस्थित असलेल्या युगांडा, केनिया, घाना, मॉरिशस, रवंडा, गांबिया, ग्याबॉन, दक्षिण सुदान, अँगोला, कॉंगो, नायजेर, मलावी, झिम्बाब्वे, नायजेरिया, लेसोथो, इथिओपिया, जीबॉउटी या देशाच्या उच्चायुक्तांचा पुणेरी पगडी देऊन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या उद्घाटनपर कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.
यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आफ्रिकन देशांबद्दल आस्था आणि आदर असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकन देशांचा जी 20 मध्ये समावेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच राज्यातील अनेक बहुराष्ट्रीय उद्योगांना भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत राज्याचा उद्योग विभाग, देशातील औद्योगिक संस्था व काही राष्ट्रांच्या वाणिज्य दूतांसोबत चर्चा करण्यात आली. यामध्ये उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले. तसेच महाराष्ट्राने अनेक राष्ट्रांसोबत केलेल्या उद्योग उभारणी बाबत सामंजस्य करार केले आहेत. या कराराच्या अंमलबजावणीस चालना देणेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच उदयोग सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औद्योगिक प्रक्रियांचे सुलभीकरण करण्यावर भर देण्यात आला.
जगातील सर्व महिलांचे प्रश्न सारखेच असून ते सोडविण्याच्या अनुषंगाने शाश्वत विकासाच्या आरखड्यावरती भर देणे आवश्यक आहे. कोणीही विकासापासून वंचित राहू नये या संयुक्त राष्ट्र संघाच्या ध्येयानुसार शाश्वत विकास उदिष्टांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यासाठी विधीमंडळ सकारात्मक असुन विधानसभा व परिषदेत सर्व पक्षांनी एकत्र येऊन कार्यक्रम घेतलेले आहेत तसेच त्यांच्या अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय समिती नेमण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला यांनी मानवी मूल्यांचे जतन व्हावे यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
