Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

झी मराठीवर दादा कोंडके फिल्म फेस्टिवल

दादा कोंडके यांच्या सिनेमे पाहत सत्तरच्या दशकातील तरूणाईच नव्हे तर ज्येष्ठत्वाच्या उंबरठ्यावरचे प्रेक्षकही दादांसाठी वेडे होते. दादांच्या सिनेमांनी मराठी सिनेमा गाजवलेल्या काळातील प्रेक्षकांच्या पिढीची नाळ आजही दादांच्या सिनेमाशी जोडलेली आहे. आजच्या तरूणाईलाही दादांच्या सिनेमातील इरसाल विनोद हवाहवासा वाटतो, यातच दादांनी प्रेक्षकांची मनं कशी जिंकली आहेत हे दिसून येतं.

८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादांचा १९६९ ला ‘ तांबडी माती ’ या सिनेमापासून सुरू झालेला प्रवास १९९४ ला ‘ सासरचं धोतर ’ या सिनेमापर्यंत येऊन थांबला. आता दादांच्या गाजलेल्या सिनेमांची मेजवानी झी मराठीने प्रेक्षकांसाठी आणली आहे. विनोदसम्राट दादा कोंडके हे एक असं पर्व होतं ज्याने मराठी सिनेमाला मातीतल्या अस्सल विनोदीपटाचा परिसस्पर्श दिला. त्या दादांना त्यांच्या ज्युबिलीस्टार ६ सिनेमांद्वारे मानाचा मुजरा करण्यासाठी झी मराठी सुद्धा सज्ज झाली आहे.
पाच दशके होत आली तरी ज्यांचा सिनेमा आजही ताजातवाना वाटतो, त्यातील विनोद खळखळून हसवतो त्या विनोदाच्या सम्राटाला झी मराठीमुळे पुन्हा भेटण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. विनोदातील निखळपणा कायम ठेवत शाब्दीक कोट्यांमधून इरसाल फटाकडे वाजवणाऱ्या विनोदवीर अभिनेते , दिग्दर्शक ज्युबिलीस्टार दादा कोंडके यांच्या तीन ब्लॉकबस्टर सिनेमांची मेजवानी दादांच्या चाहत्यांना मिळणार आहे. ८ ऑक्टोबर पासून दर रविवारी दादा कोंडके यांच्या छप्परफाड प्रतिसाद मिळालेल्या तीन सिनेमांतून विनोदाच्या सरी बरसणार आहेत. सायंकाळी ७ वाजता दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांतून मनोरंजनाची बरसात होणार आहे. मराठी सिनेमाला विनोदी चित्रपटांचा सुवर्णकाळ दाखवणाऱ्या, मराठी मातीतील अस्सल गावरान सिनेमातून रांगडा नायक लोकप्रिय करणाऱ्या दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांची मालिका सलग ३ रविवारी प्रेक्षकांसाठी झी मराठीने आणली आहे. यानिमित्ताने दादा कोंडके यांच्या अनेक आठवणींनाही उजाळा मिळणार आहे.
दादा कोंडके यांचा सिनेमा म्हणजे विनोदाचे अजब रसायन. सिनेमाची कथा, संवाद, दिग्दर्शन, गाण्यांची निवड या सगळ्यात दादांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यांच्या काळातील हिंदी सिने-निर्मातेही, दादा कोंडकेंचा सिनेमा लागला की आपला सिनेमा पुढे ढकलायचे इतकी दादांच्या सिनेमांची लोकप्रियता होती. दादांच्या सिनेमाची कथा तर हिट व्हायचीच पण त्यांच्या सिनेमातील नायकाच्या रूपातील दादांचा तोरा , गाणी, संवाद यामुळे दादांचा सिनेमा किमान २५ आठवडे तरी थिएटरवर झळकलेला असायचा. दादा कोंडके यांचा नवा सिनेमा प्रदर्शित झाला की तो सिल्वर ज्युबिली साजरी करूनच पोस्टर खाली उतरणार हे समीकरणच होतं. त्यामुळे दादांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. त्यातूनच दादांच्या सिनेमांना ज्युबिलीस्टार सिनेमा अशी ओळख मिळाली. दादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आणि अलगद रडवलेही. विनोदी सिनेमांनाही कारूण्याची किनार कशी द्यायची याची नस दादांना सापडली होती.
गुडघ्यापर्यंत चड्डी, लोंबणारी नाडी, त्यावर हाफ हाताचा कुर्ता, केसांचा पैलवान कट, बारीक मिशी या रूपातील रांगडा नायक दादा कोंडके यांनी अफलातून साकारला. संवाद म्हणण्याची लकब आणि त्यात सहजपणे विनोदी फटकेबाजी म्हणजे दादांचा सिनेमा. त्याही पुढे जाउन दादा कोंडके यांचा सिनेमा कधीच शिळा होत नाही. आता हीच पर्वणी झी मराठी घेऊन आली आहे.
‘वाजवू का’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘मुका घ्या मुका’ अशा सिनेमांचा आनंद देण्यासाठी दादा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच ही उत्सुकता संपणार आणि दादा कोंडके यांच्या ज्युबिलीस्टार सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. दादांचे सिनेमे थिएटरमध्ये पाहिलेल्या प्रेक्षकांना तर तो काळ पुन्हा अनुभवता येईलच पण दादा कोंडके या नावाचा काय जलवा होता हे नव्या पिढीतील प्रेक्षकांनाही कळेल.

तेव्हा पाहायला विसरू नका झी मराठीवर दादा कोंडके फिल्म फेस्टिवल ८ ऑक्टोबरपासून संध्या. ७ वा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading