Monday, November 2, 2026
Latest NewsPUNE

पालकमंत्र्यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या विश्वस्तांचा सन्मान

पुणे : गणेशोत्सवात पुण्याच्या वैभवशाली सांगता मिरवणुकीमध्ये भाविकांच्या भावनांचा विचार करिता दुपारी ४ वाजता सहभागी होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणा-या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या विश्वस्तांचा सन्मान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. विठ्ठलाची मूर्ती देत चंद्रकांत पाटील यांनी थेट गणपती मंदिरात सर्व विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शाल व श्रीफळ देऊन देखील सन्मानित केले.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येऊन पालकमंत्र्यांनी विश्वस्तांचा सन्मान करणे, ही पहिलीच वेळ आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब उर्फ रामचंद्र परांजपे, उपाध्यक्ष सुनील रासने, सरचिटणीस हेमंत रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी यांसह सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ट्रस्टच्या विश्वस्तांनी धाडसाने सांगता मिरवणूक लवकर काढणार हे घोषित केले. त्यानंतर असंख्य दबाव निर्माण झाले असतील, दृश्य आणि अदृश्य अशा कोणत्याही दबावाला विश्वस्त बळी पडले नाहीत, तसेच माघार घेतली नाही. तसेच वेळेवर मिरवणूक काढून ती वेळेत संपवली, याबद्दल मी पालकमंत्री या नात्याने अभिनंदनासोबतच आभार मानायला आलो आहे.

ते पुढे म्हणाले, पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक लवकर पूर्ण व्हावी, याकरिता ट्रस्टने पायंडा पाडला आहे. पुढच्या काळात इतर मंडळे देखील असाच निर्णय घेतील आणि एक दिवस असा उजाडेल की सूर्योदयापूर्वी पुण्यातील गणपतीच्या मिरवणुकी पूर्ण होतील. वेळेत गणपती विसर्जन होणे आवश्यक आहे. सकाळी १० ते पहाटे ६ या कालावधी देखील मोठा आहे. पुढील वर्षी मिरवणुका पहाटे ६ च्या आधी संपवायच्या असतील, तर त्याची सुरुवात दगडूशेठ गणपती मंडळाने यावर्षीच केल्याचे गौरवोद्गार चंद्रकांत पाटील यांनी काढले.

Leave a Reply