Thursday, May 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘ती’ वाघनखे शिवरायांची नाहीत, सरकारने दिशाभूल करू नये – इतिहास संशोधक इंद्रजित सावंत

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखं ही लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. ती वाघनखे राज्य सरकारला पुढील तीन वर्षांसाठी दिली जाणार आहेत. नोव्हेंबरमध्ये ही वाघनखे मुंबईत आणली जाणार असून तेथून सातारा, नागपूर आणि कोल्हापूर येथे या नखांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही शिवरायांची खरी वाघनखे आहेत का? त्यांनी खरंच ती वाघनखं वापरली होती का? असे प्रश्न  उपस्थित केले आहेत. तर  कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी देखील सरकारच्या वाघनखासंदर्भातील दाव्यावर अनेक सवाल उपस्थित करत ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली नाहीत असे सांगत सरकारने जनतेची दिशाभूल करू नये असे म्हटले आहे.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या वाघनखासंदर्भात इतिहासाचा उलगडा करत अनेक प्रश्न उपस्थित केले असून अफजलखानाच्या वधाच्या वेळेला जी वाघनखं तसेच शस्त्र वापरली याविषयीची स्पष्टता इ.स. १९१९ पर्यंत होती. ही शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. मात्र आत्ता जे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखं राज्य सरकार भारतात तीन वर्षांसाठी आणत आहेत, ती अफजलखानाचा वध केलेली वाघनखं नाहीत हे स्पष्ट असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.

इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर सातारा छत्रपतींच्या गादीवर प्रतापसिंह महाराज यांना बसवलं होतं. त्या महाराजांनी जेम्स कनिंगह्याम ग्रँट डफ नावाच्या इतिहासकाराला ज्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला, जो साताऱ्याचा रेसिडेंट सुद्धा होता तसेच  प्रतापसिंह महाराजांशी त्याची चांगली दोस्ती होती. त्यांना भेट म्हणून वाघनखं दिली होती. ती वाघनखं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ग्रँट डफ यांचा वंशज अंड्रियन ग्रँट डफ यांना तिथे दिसली असून तशी स्पष्ट नोंद म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध आहेत. त्या वाघ नखाच्या लेबलवर देखील उल्लेख असून संग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये देखील ती वाघ नखे ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल वाघ नखे असल्याची अशी कोणतीही नोंद नाही, असे इंद्रजित सावंत म्हणाले.

तसेच जर अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे जर इ.स. १९१९ पर्यंत साताऱ्यात असलेल्या नोंदी आणि त्याचे छायाचित्र आहेत तर मग तर इ.स १९१९ च्या अगोदरच म्हणजे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये जमा झालेली वाघनखे शिवछत्रपतींची असूच शकत नाही, असा दावा इंद्रजित सावंत यांनी केला आहे. त्यामुळे सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही परत आणतोय ही कथा रचली जात आहे. ती पुर्णपणे खोटी असून हे इतिहासाच्या आणि इतिहास लेखन शास्त्राच्या कसोटीवर टिकत नाही, असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलं.

आमच्यासारख्या संशोधकांनी त्याविषयीचा रिसर्च करून शोध निबंध लिहिले आहेत. मात्र शासन नवीनच कुठला तरी शोध लावतंय आणि शिवछत्रपतींची नसणारी गोष्ट शिवछत्रपतींची आहे असं सांगत आहे. ही जनतेची दिशाभूल करायची गोष्ट आहे. ती शासनाने थांबवावी आणि जर त्यांच्याकडे या संदर्भातले पुरावे असतील तर शासनाने जनते समोर आणावेत, असे आव्हानच इंद्रजित सावंत यांनी राज्य सरकारला दिले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading