‘आदू बाळा’ मध्ये जे ‘बाळ’ येतं ते बाळासाहेबांच्या नावात आहे लक्षात ठेवा – आदित्य ठाकरेंचा भाजपवर पलटवार
औरंगाबाद : ‘मी बालबुद्धीला उत्तर देत नाही’, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शब्दांत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वाघनखांवरून उपस्थित केलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर दिलं. इंग्लंडमधून आणली जाणारी वाघनखं महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन आहेत हे स्पष्ट करावं, असं आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला म्हटलं होतं. त्यानंतर यावर फडणवीसांनी उत्तर दिलं. यावरून आता दोघांमध्ये खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे यांनी पलटवार करताना फडणवीसांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, या एकट्या आदू बाळानं या सरकारला सळो की पळो करून सोडलं असून ‘आदू बाळा’ मध्ये जे ‘बाळ’ येतं ते बाळासाहेबांच्या नावात आहे लक्षात ठेवा .
छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमध्ये असणारी वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. तशी माहिती राज्य सरकारच्यावतीनं देण्यात आली. यावरून आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले होते. याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना, मी बालबुद्धीला उत्तर देत नसल्याचं म्हटलं. यावरून आता आदित्य ठाकरेंनी पलटवार केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, या आदू बाळानं या सरकारला किती सळो की पळो केलंय हे दिसत आहे. देशात एका नेत्याला पप्पू नाव ठेवलं होतं त्याने यांना हलवून ठेवलं आहे आणि आता राज्यात हे आदू बाळ, असं म्हणताना त्यांनी बाळ या नावावर स्पष्टीकरण देत अभिमान बाळगला. आदित्य ठाकरे म्हणाले की, बाळ हे नावं माझ्यासाठी अभिमानाचं कारण माझ्या आजोबांचंही नाव बाळ होतं आणि त्यामुळे हे रक्तात आहे.
परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेल्या भाषेतून त्यांची निराशा आणि त्यांचे खालच्या पातळीचे विचारही आता दिसू लागले आहेत. हा नवीन भाजपचा चेहरा आहे का? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला.
ज्या भाजपला आम्ही ओळखत होतो की वाजपेयींची, अडवाणींची भाजप होती. नवं भाजप असं असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. परंतु असं बोललेच आहेत तर आता त्यांनी त्यांची ही भाषा मतदारांना पटवून दाखवावी, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
