Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

लकडी पूल विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात

पुणे : पेशवेकालीन २०० वर्षे पुरातन श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने टिळक चौकातील लकडीपूल विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरात सुंदर फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विठ्ठल-रुक्मिणीच्या विलोभनीय मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.

आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. एकादशीनिमित्त आंबेगाव तालुक्यातील फुलवडे येथील आदिवासी आश्रम शाळेतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांचे संच मंदिरातर्फे देण्यात आले. यावेळी अध्यक्ष दिलीप काळभोर, कार्योध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दिपक थोरात, सचिव नरेंद्र गाजरे, सहसचिव बाळासाहेब ताठे, उत्सव प्रमुख महेश अंबिके, ज्येष्ठ सदस्य रमेश मणियार उपस्थित होते. मंदिरात अनुजा पंडीत यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम झाला.

दीपक थोरात म्हणाले, आषाढी एकादशी निमित्त पहाटे मंदिरात पंढरपूर प्रमाणेच विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. माजी सरपंच निर्मला विलास तुपे आणि सामाजिक कार्यकर्त्या इंदिरा पाटील यांनी ही महापूजा केली. यावेळी १ हजार किलो खिचडी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली. पालखी सोहळ्यानिमित्त मंदिरात ३ दिंड्या मुक्कामी असतात. यावेळी वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading