गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांचा उलगडला सांगीतिक जीवनप्रवास
पुणे : स्वत:चे गायन निर्णायक पद्धतीने गाजविण्याचा प्रासादिक गुणधर्म गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्यात होता. ते सिद्ध गायक होते. सांगीतिक क्षेत्रात त्यांचे नाव अतिशय आदराने व अभिमानाने घेतले जाते. अनवट-अप्रसिद्ध रागांमध्ये चाली बांधणे ही वझेबुवांची खासियत होती. त्यांच्याकडे अनवट रागांचा खजिनाच होता. त्यांच्या गायनातून उद्बोधन व मनोरंजन यांचा ताळ-मेळ साधला जात असे, अशा शब्दांत विदुषी मंजिरी कर्वे-आलेगांवकर यांनी वझेबुवांचा सांगीतिक जीवनप्रवास उलगडून दाखवितानाच त्यांच्या गायन शैलीची झलक उपस्थितांना दाखवून अचंबित केले.
गानवर्धन संस्थेतर्फे गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्या गायकीवर आधारित अनोख्या मैफलीचे शनिवारी एस. एम. जोशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यात आलेगांवकर यांनी वझेबुवा यांच्या गायकीचे वैविध्यपूर्ण पैलू उलगडून दाखविले. त्यांना सौरव दांडेकर (संवादिनी), अजित किंबहुने (तबला), स्वराली आलेगांवकर, कीर्ती कुमठेकर, प्राची गोडबोले, डॉ. मृणाल वर्णेकर यांनी साथसंगत केली. या प्रसंगी संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री व ज्येष्ठ गायिका निर्मलताई गोगटे यांची विशेष उपस्थिती होती.
वझेबुवांचे गायन वैशिष्ट्य उलगडून दाखविताना मंजिरी कर्वे-आलेगांवकर यांनी तिलक कामोद रागातील ‘तिरथ को सब करे’ ही बंदिश सादर केली. वझेबुवांना सादिक अली खाँ यांच्याकडून मिळालेली ‘आवता घर आए बालम’ ही द्रुत तालातील बंदिश त्यांनी रसिकांना ऐकविली. आपले वडिल तबला शिकत असल्यामुळे त्यांना त्या काळातील अनेक बुजुर्ग गायकांच्या रियाजाच्या आंतरदालनात सहजतेने प्रवेश मिळाल्याचे सांगून वझेबुवांसह वडिलांनी अनेक मैफलींना हजेरी लावल्याची आठवण त्यांनी सांगितली. वयाच्या 12व्या वर्षी संगीत शिक्षणाच्या ओढीने सावंतवाडी येथून अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडलेल्या वझेबुवांनी अनेक हालअपेष्टा, अपमान सहन करत भारतभर प्रवास करून विविध घराण्यातील गायकांकडून संगीताची तालीम मिळविली. त्या काळात वझेबुवांची स्वामी विवेकानंद यांच्याशी भेट झाली होती. स्वामीजींनी वझेबुवांना काही दोहे शिकविले त्यातील ‘परम पुरुख नारायण भज मन’ हा दोहा ऐकवून आलेगांवकर यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
वझेबुवांनी मैफलींसह ज्ञानदानाचे कार्य निरपेक्ष भूमिकेतून केले. तसेच बलपेचयुक्त सौंदर्यपूर्ण गायकी ग्वाल्हेर घराण्यात निर्माण केली, अशी महती वर्णन करून आलेगांवकर यांनी ‘मो मनको बसिया कन्हैया’ या भैरवीने मैफलीची सांगता केली.
प्रास्ताविक दयानंद घोटकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राजश्री महाजनी यांनी केले. आभार सचिव रवींद्र दुर्वे यांनी मानले.
