Monday, June 15, 2026
BusinessLatest News

क्रेडाई पदाधिकारी होणे ही संधी नव्हे तर जवाबदारी

पुणे : क्रेडाई महाराष्ट्रची राज्यातील शहर संघटनांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी नवोदित कार्यकारणीला संबोधित करताना ” क्रेडाई पदाधिकारी होणे ही संधी नसून जबाबदारी आहे. ” असे सांगत क्रेडाई-नॅशनलचे अध्यक्ष बोमन इराणी आणि क्रेडाई नॅशनल चे माजी चेअरमन सतीश मगर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहित केले.

यावेळी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार पाटील, क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुर्डे, माजी अध्यक्ष राजीव पारीख, प्रशांत सरोदे, अनंत राजेगावकर, संतदास चावला, जितेंद्र ठक्कर, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर, प्रभारी शांताराम पाटील, उपाध्यक्ष सुनील कोतवाल व क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष कृणाल पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कालिका स्टीलचे संचालक अनिल गोयल यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी महारेराचे मुख्य नियोजन अधिकारी अरुण नाडगौडा आणि कायदा अधिकारी महेंद्र मुळे यांनी महारेरा नोंदणी प्रक्रियेतील समस्येविषयी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. ‘महारेरा कायदा हा तांत्रिकदृष्ट्या समजायला क्लिष्ट असला तरी सर्व विकासकांनी तो समजून घेतला पाहिजे. हा कायदा नसून विश्वास आहे. प्रशासन, ग्राहक आणि व्यावसायिक यांना जोडणारा हा सर्वसमावेशक दुवा आहे.’ असे त्यांनी सांगितले.

जितेंद्र ठक्कर , सतीश मगर,बोमन इराणी, प्रमोद खैरनार पाटील , गौरव ठक्कर , संकेत तुपे यांचे ‘ क्रेडाई काल, आज आणि उद्या ‘ या विषयावर चर्चासत्र झाले. क्रेडाई संबंधित वार्षिक नियोजन पुस्तिका, दिनदर्शिका आदी पुस्तिकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. राजीव पारीख यांनी ‘ शहराचे नेतृत्व करणार्‍यांची कर्तव्ये, दृष्टी, ध्येय आणि उद्दिष्टे ‘ याविषयी आपले मत मांडले. प्रशांत सरोदे यांनी ‘ वैधानिक अनुपालन प्रणाली आणि व्हायब्रंट शहर ‘ तर प्रमोद खैरनार पाटील यांनी ‘समस्या सोडवणारी क्रेडाई संस्था ‘ तसेच सुनील कोतवाल यांनी “कार्यकालावधी व त्यातील कार्यक्रम “ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रसिद्ध वक्ते नितीन बानगुडे पाटील यांच्या ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व आणि संघटनात्मक कौशल्ये ‘ याविषयीच्या व्याख्यानाने पहिल्या दिवसाच्या सत्राची सांगता झाली.

नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर क्रेडाई महाराष्ट्राची पहिलीच सर्वसाधारण सभा कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या पूर्वार्धात पार पडली. यानंतर ‘ जमीन आणि महसूल समस्या’ यातील बारकावे शेखर गायकवाड यांनी उलगडून सांगितले. ‘शहरी महाराष्ट्र आणि यावेळी क्रेडाईच्या महीला विंग आणि युथ विंग सदस्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. अनंत राजेगावकर यांनी क्रेडाई नॅशनल च्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला व विद्यानंद बेडेकर यांच्या आभारप्रदर्शना नंतर सभेची सांगता झाली.

प्रामुख्याने, राज्यातील ६५ शहर संघटनातील नवनिर्वाचित कार्यकारिणीला एकत्रित काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे व बांधकाम क्षेत्राशी निगडित त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निरसन करणे हा यामागील मुख्य हेतू होता. संस्थेच्या शहर संघटनेतील २७५ हून अधिक पदाधिकारी यात सहभागी झाले. रसिक चौहान, सुनील कोतवाल, आदित्य जावडेकर, राजेंद्र यादव , दिनेश ढगे, डॉ. धर्मवीर भारती, शांताराम पाटील, राजेश वाजे, आशिष पोखरना , अनील आहेर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading